दरडींचा धोका असलेल्या गावांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे होणार सुरक्षेची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:59 PM2017-12-29T12:59:07+5:302017-12-29T13:15:44+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्ह्यातील २३ गावांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विकास कामे हाती घेण्यात येणार असून, माळीणप्रमाणे दरडींचा धोका असलेल्या गावांमध्ये ही कामे केली जाणार आहेत.
पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्ह्यातील २३ गावांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विकास कामे हाती घेण्यात येणार असून, माळीणप्रमाणे दरडींचा धोका असलेल्या गावांमध्ये ही कामे केली जाणार आहेत. त्यामुळे संभाव्य धोका टळणार आहे.
माळीणमध्ये झालेल्या दुर्घटनेत १५१ ग्रामस्थांना आपले प्राण गमवावे लागले होते. या गावामध्ये पुनर्वसनाचे काम झाल्यानंतर, नव्याने गाव उभे करण्यात आले. या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील अशा स्वरूपाच्या संवेदनशील गावांची पाहणी करून उपाययोजना करण्याचे धोरण आखण्यात आले होते. त्यानुसार अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून गावांची पाहणी करून यामधून २३ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने करावयाच्या विकासकामांबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी बैठक घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विकासकामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयाने यातील काही गावांमध्ये तातडीने उपाययोजना करण्याच्या शिफारशी केल्या आहेत. यासोबतच काही गावांमध्ये दीर्घकालीन उपाययोजना करण्याचेही सुचविण्यात आले आहे. मात्र, अनेक दिवसांपासून निधीअभावी ही कामे रखडल्याने विलंब लागत होता.
निधी मंजूर झाल्याने अत्यावश्यक कामांना सुरुवात केली जाणार असून पावसाळ्यापूर्वी पीडब्ल्यूडी ही कामे पूर्ण करणार आहे. या गावांमध्ये तात्पुरत्या उपायोजना करण्यात आल्या
आहेत.
तालुका | गावे |
मुळशी | घुटके |
मावळ | भुशी, मालेवाडी, सावळे, माऊ, लोहगड, ताजे, बोरज, तुंग |
भोर | धानवली, कोले (जांभवली), डेहणे, पांगरी (सोनारवाडी) |