एकबोटे, भिडे यांच्या अटकेवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2018 04:02 PM2018-02-04T16:02:11+5:302018-02-04T16:03:05+5:30
गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील आरोपी विरेंद्र तावडेला जामीन मिळत असेल तर कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांनाही भीती नाही.
पुणे : गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील आरोपी विरेंद्र तावडेला जामीन मिळत असेल तर कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांनाही भीती नाही. या दोघांना राज्य सरकारचे अभय असल्याने त्यांना अटक होईल यावर विश्वास नाही, असे स्पष्ट मत आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले. तसेच धर्मा पाटील यांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार असून जनता त्यांच्यावर कारवाई करेल, असेही पाटील म्हणाले.
राज्य सरकारचे विविध निर्णय तसेच धोरणांवर पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत टीका केली. कोरेगाव भीमा येथील दंगलीवर बोलताना ते म्हणाले, एकबोटे आणि भिडे गुरूजी यांनी दंगल घडवत समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यामुळे सरकार टिकून असल्याने त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा असला तरी सरकार त्यांना अटक करेल, यावर माझा विश्वास नाही. भाजपाकडून फॅसिस्ट प्रवृत्तीला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. देशभरात जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे धोक्यात आलेले लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी विरोधकांनी एकत्र यायला हवे. धर्मा पाटील यांचा मृत्यू म्हणजे शेतकरी धर्माचा बळी आहे. त्यांच्या मृत्युला सरकारच जबाबदार असून जनताच त्यांना खाली खेचून कारवाई करेल, असेही पाटील यांनी नमुद केले.
राज्य शासनाच्या शैक्षणिक धोरणावर टीका करताना पाटील म्हणाले, खासगी कंपन्यांना आणून शिक्षणाचे बाजारीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. रामदेव बाबांच्या पतंजलीचा शिक्षणातही शिरकाव होईल. मराठी शाळा बंद करून गरीबांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. त्याला आमचा कडाडून विरोध राहील. सरकारकडून केवळ अच्छे दिनचे स्वप्न दाखविले गेले. केंद्रीय अर्थसंकल्पातून हेच दिसून आले. ‘चाय कम किटली गरम’ अशा स्वरूपाचा हा अर्थसंकल्प असल्याची टीका पाटील यांनी केली.