पुण्याच्या वाहतुकीचे प्रश्न लागणार मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 07:00 AM2018-05-13T07:00:36+5:302018-05-13T07:00:36+5:30
पुणे आणि परिसरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन ‘लोकमत’च्या व्यासपीठावर दिले होते
पुणे : पुणे आणि परिसरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन ‘लोकमत’च्या व्यासपीठावर दिले होते. त्याप्रमाणे बहुतांश कामे मार्गी लागली आहेत. पुण्यात आज रस्त्यांच्या संदर्भातील बैठक हा या आश्वासनाचाच एक भाग होता, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना आज सांगितले.
पुणे परिसरातील महामार्गांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी पुण्यात गडकरी यांनी बैठक घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी उपस्थित होते. या बैठकीत गडकरी यांनी पुणे परिसरातील प्रकल्पांचा आढावा घेतला.
नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत २२ आॅगस्ट २०१५ रोजी ‘लोकमत’च्या आयकॉन्स कॉफीटेबल बुकचे प्रकाशन झाले होते. ‘लोकमत’च्या ‘व्हिजन पुणे’ मोहमेअंतर्गत लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी पुण्याची मेट्रो, विमानतळ, रिंग रोड, लगतचे महामार्ग, शहरातील उड्डाणपूलआणि रस्ते या विषयीचे गाºहाणे पुणेकरांच्या वतीने नितीन गडकरी यांच्याकडे मांडले होते. या कार्यक्रमातच पुण्याच्या वाहतूक प्रश्नांच्या सोडवणुकीचे आश्वासन देत तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले होते. पुण्याची मेट्रो, रिंगरोड आणि विमानतळाचा प्रश्न एका महिन्याच्या आत बैठक घेऊन सोडवू, असेही गडकरी यांनी सांगितले होते.
त्यानंतर गडकरी यांनी जणू दिल्लीमध्ये पुण्याचे पालकत्व स्वीकारले. पुणे विमानतळाच्या प्रश्नासंदर्भात संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये बैठक घडवून आणली. त्यानंतर पुण्यामध्येही बैठक घेतली. पुण्यासाठी आंतराष्टÑीय विमानतळ होतानाच लोहगाव विमानतळाचाही विकास व्हावा, ही भूमिका गडकरी यांनी मांडली होती. त्याप्रमाणे विमानतळाच्या विकासासाठी २६ एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. गडकरी यांनी घेतलेल्या पुढाकाराने लोहगाव विमानतळाचा मेकओव्हर झाला.
विजय दर्डा यांनी पुणे- नाशिक मार्गाची दुरवस्थाही गडकरी यांच्यासमोर मांडली होती. हा मार्ग अत्यंत अडचणीचा बनला आहे. त्यामुळे पुणे- मुंबई- नाशिक या सुवर्णत्रिकोणाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे नाशिक फाटा ते खेड या राष्ट्रीय महामार्ग ६० वरील कामे सध्या निविदास्तरावर आहेत. त्यासाठीची आवश्यक कामे पूर्ण करण्याच्या सूचना गडकरी यांनी आजच्या बैठकीत दिल्या.
नागपूर मेट्रोसाठी अडीच वर्षांचा कालबध्द कार्यक्रम आखला आहे, त्याप्रमाणेच पुण्यातील मेट्रोच्या कामाला तातडीने सुरूवात करावी, अशी मागणी दर्डा यांनी केली होती. त्याप्रमाणे गेल्या तीन वर्षांत पुणे मेट्रोने वेग घेतला आहे.
‘लोकमत’ने सातत्याने पुण्याच्या वाहतूक प्रश्नांवर जनजागरण केले. समस्या मांडतानाच ‘बिल्डींग पुणे’ सारखे उपक्रम राबवून त्याच्यावरील उपाययोजनांचीही चर्चा केली. नितीन गडकरी यांच्यासारख्या धडाकेबाज आणि कार्यतत्पर मंत्र्याने त्यामुळेच दिल्लीत पुण्याचे पालकत्व स्वीकारून पुणे आणि परिसरातील रस्त्यांच्या कामाला वेग दिला. @‘लोकमत’ने पुढाकारामुळे पुण्याच्या वाहतुकीसह विविध प्रश्न ऐरणीवर आणले. त्यांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे बहुतांश प्रश्न मार्गी लागल्याबद्दल पुणेकरांनी व स्वत: नितीन गडकरी यांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले आहेत.
भूसंपादन करा,
तीन वर्षांत रिंग रोड उभारून देतो
पुण्याच्या रिंगरोडसाठी ८० टक्के भूसंपादन करा, तीन वर्षांत रस्ता उभा करून देतो, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी बैठकीत दिले. रिंगरोडसाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनाचे प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी.
केंद्र शासनाकडे निधीची कमतरता नाही.त्यामुळे कोणत्याही प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे गडकरी स्पष्ट करून गडकरी म्हणाले, पुणे रिंगरोडचे काम टप्प्या टप्याने करणे योग्य ठरणार नाही.त्यामुळे रिंगरोडसाठी ८० टक्के जागेचे भूसंपादन करावी. त्याशिवाय रिंगरोडच्या प्रत्यक्ष कामास परवानगी दिली जाणार नाही.
सध्याचा रिंगरोड २० वर्षापूर्वीच्या विकास आराखड्याच्या आधारे तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणा-या तज्ज्ञांचे सहकार्य घ्यावे,असेही गडकरी यांनी सांगितले.
लष्कराच्या ताब्यातील जमीन
हस्तांतरणाचे प्रस्ताव माझ्याकडे पाठवा
लष्कराच्या ताब्यात असलेल्या जमीनीच्या हस्तांतरणाचे प्रश्न असल्याने अनेक कामे रखडली आहेत, अशा तक्रारी गडकरी यांच्याकडे करण्यात आल्या. महामार्गावरील लष्कराच्या ताब्यात असणा-या जमिनींच्या हस्तांतराबाबतचा प्रस्ताव माझ्याकडे पाठवावा,अशाही सूचना गडकरी यांनी केल्या.
पुणे विभागातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.या विभागातील कामांसंदर्भात येणा-या अडचणीसंदर्भात राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे महानगर विकास प्राधिकरण,सार्वजनिक बांधकाम विभाग, भूसंपादन विभाग यांची बैठक घेवून तात्काळ प्रश्न सोडवून कामाला सुरूवात करावी, असेही त्यांनी सांगितले.
पुणे विभागात २२ हजार ८३४ कोटी रुपयांचे विकास प्रकल्प
सध्या पुणे विभागात निविदा प्रक्रिया तसेच विकास प्रकल्प आराखडा तयार करण्याची प्रक्रिया २५ प्रकल्पांची सुरु असून त्याचा अंदाजित खर्च हा २२ हजार ८३४ कोटी इतका आहे. सध्या ४ प्रकल्पांचे काम सुरु असून ४७७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे सुरु आहेत तर ६ प्रकल्पांची ३४४ किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. सध्या संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग, संत तुकाराम पालखी मार्ग, पुणे शहरातील चांदनी चौक एकात्मिक मार्ग, खंबाटकी घाटातील सहा पदरी बोगदा, सोलापूर शहरातील उड्डाण पूल, राष्ट्रीय महामार्ग १६६ वरील रत्नागिरी- कोल्हापूर मार्गावरील काम आणि नाशिक फाटा ते खेड या राष्ट्रीय महामार्ग ६० वरील कामे सध्या निविदास्तरावर आहेत. त्यासाठीची आवश्यक कामे पूर्ण करण्याच्या सूचना नितीन गडकरी यांनी दिल्या.