नवाब मलिक अन् समीर वानखेडेंच्या प्रश्नांवर अजित दादा म्हणाले, 'नो कमेंट्स'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 08:35 PM2021-10-22T20:35:14+5:302021-10-22T20:35:22+5:30
पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत एरवी शांत आणि संयमी असणारे अजित पवार आज भर पत्रकार परिषदेत खवळल्याचे पहायला मिळाले.
पुणे : पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत एरवी शांत आणि संयमी असणारे अजित पवार ( Ajit Pawar) आज भर पत्रकार परिषदेत खवळल्याचे पहायला मिळाले. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविषयी विचारलेल्या एका प्रश्नावरून हा सर्व प्रकार घडला. नो कमेंट्स (No Comments) असे म्हणत पुन्हा जर हा प्रश्न विचारला तर मी उठून जाईन असे ते म्हणाले.
पुण्यातील विधान भवन येथे प्रत्येक शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडते. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधतात. आज देखील त्यांची पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेत अजित पवारांना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविषयी केलेल्या वैयक्तिक विरोधात विचारले असता अजित पवार खवळले.
मला नो कमेंट्स म्हणण्याचा अधिकार आहे.
''नवाब मलिकांबद्दल मला काही विचारू नका, त्यांचे प्रश्न त्यांना विचारा, समीर वानखेडेंचे प्रश्न त्यांना विचारा. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी या ठिकाणी आलो नाही..इतर काही बोलले त्याबद्दल उत्तर देण्याला मी बांधील नाही. तुम्हाला जसा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तसा मला नो कमेंट्स म्हणण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नो कमेंट्स. त्याबद्दल तुम्ही पुन्हा विचारणार असाल तर मी उठून जाईन. असं ते यावेळी म्हणाले आहेत.''
दिवाळीनंतर १०० टक्के क्षमतेने थिएटर सुरू करण्याचा विचार
''दिवाळीनंतर १०० टक्के क्षमतेने थिएटर सुरू करण्याचा विचार आहे. तसेच गेल्या ९ दिवसांत लसीकरणात वाढ झाली आहे. राज्यात १० कोटींपेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. लस घेऊनही ६० वर्षांवरील नागरिकांमध्ये कोरोनाची लागण होत असल्याचे आढळले. पुणे मेट्रोसाठी 'नागपूर पॅटर्न' राबविला जाणार. पुणे मेट्रोसाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम दिवाळीच्या आसपास सुरू होईल असे पवार यांनी सांगितले.''
तपासात जे काही निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई होईल
''भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खोटा असून वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी करून काहीही उपयोग नाही. तसेच सध्या खोटी आकडेवारी दाखवून आरोप केले जात आहेत. एनसीबी प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव घेतलं जातं आहे यावर बोलताना पवार म्हणाले, नियम कायदा सर्वांना सारखा आहे. त्यामुळे तपासात जे काही निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई होईल. मागील काही कळत नकळत मोठमोठ्या व्यक्तीचे नाव घेण्याचे प्रकार सुरू झाले.''