पुणे - देशातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्तापालटाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर चांगलेच आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत मी मुंबईतील शिवसेनेची राहुल शेवाळे यांची मुंबईतील जागा लोकसभेसाठी लढवेन. मात्र युती झाली नाही तर मी रामटेक मतदारसंघातून लोकसभा लढवेन. त्याबाबत नितीन गडकरी यांच्याशी बोलणे झाले आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले, “सत्तेत आहे म्हणून निळा झेंडा सोडलेला नाही. म्हणून 2019 मध्ये काय होईल याची आरपीआयला चिंता नाही. राहुल गांधींनी कितीही आकांडतांडव केला तरी त्यांना इतक्यात पंतप्रधान होता येणार नाही.नरेंद्र मोदी आमचे कॅप्टन आहेत.सर्व लोकांना न्याय देण्यासाठी आम्हाला वेळ मिळायला हवा. एनडीएत सोबत जाण्यात समाजाचे हित आहे. प्रकाश आंबेकरांना एनडीएत घेऊन येईन. एनडीए सरकारमध्ये आपल्यावर अनेक कामे झाली.काँग्रेस फक्त बाबासाहेबांच्या नावाचा वापर करत आहे. राहुल गांधी यांनी मोदींना दलित विरोधी आहेत असे म्हणत असतील तर मी सांगतो मोदी दलित विरोधी नाहीत.” यावेळी कोरेगाव भीमा प्रकरण आणि विविध संघटनांवरील छाप्यांबाबत विचारले असता, संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव प्रकरणात सहभाग आहे का याचा अभ्यास पोलिसांनी करावा.संभाजी भिडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. तसेच याव्यतिरिक्त कोणी या कटात सहभागी आहेत का याची माहिती चौकशी करावी. आम्ही नक्षलवादी नाहीत तर आंबेडकरवादी आहोत. नक्षलवाद्यांनी लुटुपुटूची लढाई करण्यापेक्षा मैदानात यावे. कोरेगाव भीमा प्रकरणात कोणत्या आंबेडकरवाद्याच्या घरावर छापे टाकले असतील ते चुकीचे आहे.त्याविरोधात मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन,” असे आठवले म्हणाले. धनगर आरक्षणाबाबत आठवले म्हणाले, धनगरांना अनेक राज्यात ट्रायबल दर्जा दिला आहे. महाराष्ट्रातही मिळायला हवा. प्रकाश आंबेडकर यांनी आत्ता धनगर समाजाला न्याय दिला असला तरी मी तो अनेक वर्षांपूर्वी दिला आहे.आदिवासी समाजाचे आरक्षण वाढवून त्यात धनगर समाजाला समाविष्ट करावे.
कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 6:34 PM