खेड तालुक्यातील निमगावात हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा; तब्बल २ लाखांची दारू नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 01:57 PM2021-06-11T13:57:31+5:302021-06-11T13:58:10+5:30
निमागावच्या तांबे वस्ती परिसरात भीमा नदीच्या काठावर शेताच्या कडेला व झाडाझुडुपांमध्ये हा अड्डा होता
दावडी: खेड तालुक्यात निमगाव येथे तांबेवस्तीत बेकायदेशीर हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर उत्पादन शुल्क पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी दारूचे २ लाख ६७ हजार रुपये किमतीचे १४ हजार लिटर रसायन नष्ट केले. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. चिराग दौलतराव राठोड (वय २८ रा. पठारवाडी चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
खेड तालुक्यातील निमगाव येथे तांबे वस्तीवर भिमानदी काठालगत हातभट्टी दारू काढली जात असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात रसायन एका शेतकऱ्याच्या शेतात तयार करण्यात येत आहे. अशी गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार विभागीय उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तयार दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला. गावठी दारू तयार करण्यासाठी लागणार कच्चा रसायनाची भट्टी जेसीबीच्या सहाय्याने फोडण्यात आली. सुमारे १४ हजार लीटर रसायन २ लाख ६७ हजार रुपये किंमतीचे रसायन नष्ट करण्यात आले. व साधन सामग्रीची तोंडफोड करून नष्ट केले.
निमागावच्या तांबे वस्ती परिसरात भीमा नदीच्या काठावर शेताच्या कडेला व झाडाझुडुपांमध्ये हा अड्डा होता. पोलिसांनी भल्या सकाळी जाऊन त्याचा शोध घेतला. वरवर काहीच जाणवत नव्हते. केवळ उग्र वास येत होता आणि जवळच दारू बनवण्यासाठी भट्टी असल्याने पोलिसांनी ठावठिकाणा लावला. विहिरी प्रमाणे दोन खड्डे तयार करून त्यात मेणकागद टाकुन त्यावर दारू, गुळ, नवसागर आणि इस असे दारू बनवण्यासाठी असणारे कच्चे रसायन एकत्रित पणे साठवण्यात आले होते. या कारवाईत उत्पादन शुल्क दुय्यम निरिक्षक अधिकारी संजय हांडे आणि त्यांचे पथक सहभागी झाले होते.