लाेकमत न्यूज नेटवर्क
महुडे : भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील होर्डोशी भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे भात शेती होय. मात्र या पिकाला सध्या वन्यप्राण्यांपासून धोका आहे. त्यांच्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी जुन्या साड्या, रंगीत कापडांचा वापर करून भातपिके वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.
भोर तालुक्यातील होर्डोशी भाग हा डोंगराळ असल्याने या भागात वन्यप्राण्यांचा वावर असतो. यात प्रामुख्याने रानडुक्कर, भेखर, सांबर, ससे, मोर, लांडोर समावेश जास्त आहे. या प्राण्यांपासून शेतातील भाताचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड चालू आहे. यासाठी वेगवेगळ्या युक्त्या शेतकऱ्यांना कराव्या लागत आहेत. राखण करणे, बुजगावणे उभारणे, पत्राचे डबे वाजवणे, फटाके वाजवणे, बिसलेरी बाटलीत वाळू भरून तारेला बांधणे अशा वेगवेगळ्या प्रकारे शक्कल लढवून शेतकरी पिकांचे रक्षण वन्यप्राण्यांपासून करत आहेत. मात्र, हे प्राणी रात्रीची वेळ साधत पिकांचे नुकसान करत आहेत. वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई वन विभागाने द्यावी अशी, मागणी हिर्डोशी येथील शेतकरी धोंडिबा मालुसरे व मारुती धामुनसे यांनी केली आहे.
फोटो: वेनुपुरी (ता.भोर) येथे शेतकरी वन्यप्राणी यापासून पिके वाचविण्यासाठी केलेले कुंपण.