पुणे, मुंबईसह कोकणात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:29 AM2020-12-15T04:29:26+5:302020-12-15T04:29:26+5:30
पुणे : अरबी समु्द्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा सर्वाधिक परिणाम आज राज्यभरात दिसून आला असून ढगाळ हवामान, मधूनच ...
पुणे : अरबी समु्द्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा सर्वाधिक परिणाम आज राज्यभरात दिसून आला असून ढगाळ हवामान, मधूनच येणार्या पावसाच्या सरी आणि धुके यामुळे हिवाळ्यात पावसाळी वातावरणाचा अनुभव पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक भागात अनुभवाला आला. उद्या मंगळवारी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या चार दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी पाऊस व ढगाळ हवामान आढळून येत आहे. रविवारी रात्रीपासून पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुंबई (कुलाबा) १४, अलिबाग ११, ओझर (नाशिक) ९, धुळे ८, महाबळेश्वर, सोनगाव २, औरंगाबाद १ मिमी पावसाची नोंद झाली होती.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यात पाऊस पडत आहे. पूर्व मध्य अरबी समुद्र ते दक्षिणपश्चिम मध्य प्रदेशापर्यंत हे क्षेत्र विस्तारले आहे. यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात ढगाळ हवामान असून काही ठिकाणी हलका पाऊसही झाला. त्यात जोरदार वारे आणि धुके यामुळे दिवसाच्या तापमानात चांगलीच घट झाल्याचे दिसून आले.
सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे ५, लोहगाव २, महाबळेश्वर ४, सांताक्रुझ १, रत्नागिरी, बुलढाणा २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मंगळवारी गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यात प्रामुख्याने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदूरबार, नाशिक या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१६ ते १८ डिसेंबर दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.