Pimpri Chinchwad: वायसीएम रुग्णालयात पावसाचे पाणी, रुग्णांची गैरसोय
By प्रकाश गायकर | Published: September 27, 2023 03:03 PM2023-09-27T15:03:42+5:302023-09-27T15:06:00+5:30
मंगळवारी झालेल्या पावसामुळे रुग्णालयातील सोनोग्राफी विभागामध्ये पाणी शिरले...
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये मंगळवारी (दि. २६) सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसाचे पाणी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये शिरल्याने रुग्णांची गैरसोय झाली. सोनोग्राफी विभागामध्ये छताचे पाणी येत असल्याने विभागामध्ये पाणी साचले आहे.
वायसीएम रुग्णालय हे शहरातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. येथे ७५० बेडची व्यवस्था असून स्त्रीरोग, दंत, कान-नाक-घसा, शस्त्रक्रिया, हाडांचे आजार असे विविध विभाग आहेत. त्यामुळे रुग्णालयामध्ये रुग्णांसह नातेवाईकांची मोठी वर्दळ असते. मात्र, सोयी-सुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याची बाब वारंवार समोर येत आहे.
मंगळवारी झालेल्या पावसामुळे रुग्णालयातील सोनोग्राफी विभागामध्ये पाणी शिरले. या विभागामध्ये थेट छताचे पाणी पडते. ज्याठिकाणी रुग्णांना बसण्याची व्यवस्था केली आहे, त्याचठिकाणी पाणी पडत असल्याने रुग्णांची गैरसोय झाली. भरपावसात वरून पडणाऱ्या पाण्याच्या धारेखाली अनेक रुग्ण उभे होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने रुग्णालयातील सेवांचे दर वाढवले आहे. दर वाढवले असताना सोयी-सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. सेवा-सुविधा न देता रुग्णांकडून पैसे घेतले जातात.