भोर : आंबवडे खोऱ्यातील टिटेघर या गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळाखोल्या, अंगणवाडी इमारत व गावातील १० ते १५ घरांची छत उडून गेली. पावसाने झोडपल्याने विद्युतवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.काल सायंकाळी पावणेचार वाजता टिटेघर गावाच्या डोंगराच्या बाजूकडून आलेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने टिटेघर येथील जिल्हा परिषदेच्या चार प्राथमिक शाळाखोल्या, अंगणवाडी इमारत व गावातील १० ते १५ घरांचे छत उडून गेले. शाळेतील व अंगणवाडीतील फर्निचर, सहित्याची मोडतोड झाली आहे. घरांचे छप्पर उडाल्याने धान्य, कपड्यांसह इतर सहित्य खराब झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे विद्युतप्रवाह वाहून नेणाऱ्या तारा तुटल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे जिल्हा परिषदेची शाळा आयएसओ करण्यासाठी शाळेची रंगरंगोटी करून सजावट करण्यात आली होती. मात्र, शाळेचे छप्पर उडून भिंतीला तडे गेल्याने शाळेच्या चारही वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. नवीन शाळाखोल्या करणे गरजेचे असून घरांची नुकसानभरपाई मिळावी, असे ग्रामस्थ व राजीव केळकर यांनी केली आहे.तहसीलदार राम चोबे यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मंडलाधिकारी व तलाठी यांना दिले असून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. दरम्यान, काल गटविकास अधिकारी संजीव गायकवाड व जिल्हा परिषदेच्या सदस्या गितांजली आंबवले यांनी टिटेघर गावातील शाळा, घरे यांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या वेळी आनंदराव आंबवले व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)तारा तुटल्याने गाव अंधारात> पावसाने नुकसान झालेल्या टिटेघर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा व अंगणवाडीचा नुकसानीचा अहवाल घेऊन त्यानुसार दुरुस्ती किंवा नवीन शाळा जिल्हा परिषदेकडून मंजूर करून घेऊ, असे या भागाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या गीतांजली आंबवले यांनी सांगितले.> दरम्यान, कालच्या पावसाने गावातील विजेच्या तारा तुटून खांब वाकले होते. यामुळे गाव अंधारात आहे. याची त्वरित दखल घेत वीज वितरण कंपनीचे कर्मचारी गावात काम करीत आहेत. आज वीजपुरवठा सुरळीत होईल, असे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी उपअभियंता विलास शिर्के यांनी सांगितले. > टिटेघर गावात काल मुसळधार पाऊस व वादळी वारा झाला. या वेळी गावातील तीन लग्ने व एक साखरपुडा असल्याने सर्व नागरिक बाहेरगावी गेले होते. त्यामुळे गावात काही मोजकेच लोक होते. यामुळे सदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही. > वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटून जमिनीवर पडल्या होत्या. त्याचा शॉक लागून जीवितहानी झाली असती; मात्र याचे प्रसंगावधान राखून संदीप मारुती नवघणे याने डीपीतील फ्यूज काढल्याने ती झाली नाही.> वडतुंबी येथील एका लग्नाचा मंडप वादळी वाऱ्यामुळे अचानक पडल्याने संपूर्ण वऱ्हाड मंडपाखाली सापडले. त्या वेळी प्रसंगावधान राखून छत फाडून लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही.
पावसाने घर, अंगणवाडीची पडझड
By admin | Published: May 07, 2015 4:48 AM