अखेर मुहूर्त ठरला ! 21 फेब्रुवारीला राज ठाकरे घेणार शरद पवारांची प्रकट मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 02:11 PM2018-02-19T14:11:07+5:302018-02-19T14:13:07+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. 21 फेब्रुवारीला राज ठाकरे शरद पवारांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.

Raj Thackeray to interview Sharad Pawar | अखेर मुहूर्त ठरला ! 21 फेब्रुवारीला राज ठाकरे घेणार शरद पवारांची प्रकट मुलाखत

अखेर मुहूर्त ठरला ! 21 फेब्रुवारीला राज ठाकरे घेणार शरद पवारांची प्रकट मुलाखत

Next

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. 21 फेब्रुवारीला राज ठाकरे शरद पवारांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. याआधी ही मुलाखत 3 जानेवारीला होणार होती. मात्र कोरेगाव भीमा हिंसाचारामुळे मुलाखतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यानंतर राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या समर्थकांसह संपुर्ण महाराष्ट्राला या मुलाखतीची उत्सुकता होती. अखेर या मुलाखतीला मुहूर्त मिळाला असून 21 फेब्रुवारीला पुण्यात संध्याकाळी 5 वाजता बीएमसीसी महाविद्यालयात ही मुलाखत होणार आहे. राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन हे जाहीर करण्यात आलं आहे.

  

आपल्या रोखठोक वक्तव्य आणि स्वभावासाठी प्रसिद्द असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखती पाहण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात. पण यावेळी राज ठाकरेंना वेगळ्या म्हणजेच मुलाखतकाराच्या भूमिकेत पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी त्यांच्यासमोर असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेणार असल्याने ही मुलाखत रंगतदार होणार यात काही प्रश्न नाही. लोकांनाही या कार्यक्रमाची उत्सुकता लागून राहिली आहे.  

शरद पवार कधीच आपली राजकीय खेळी उघड करत नाहीत. शरद पवार पुढच्या क्षणाला कोणता डाव खेळतील हे त्यांच्या सहका-यांनाही माहित नसतं असं म्हणतात. दुसरीकडे आपल्या रोखठोक स्वभावामुळे प्रसिद्ध असणारे राज ठाकरे. आपल्याला जे बोलायचं आहे ते समोरच्याला थेट आणि स्पष्ट सांगणं हा त्यांचा स्वभाव. अनेकदा कोपरखळी मारत ते आपला मुद्दा मांडतात. आता हे दोन्ही नेते समोर आल्यानंतर काय धम्माल उडेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 

शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या तसेच त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. विख्यात हास्यकवी रामदास फुटाणे यांनी या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले आहे. 

शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि 50 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीच्या पार्श्वभूमीवर याआधी अनेक मुलाखती झाल्या आहेत. मात्र या मुलाखतींमध्ये नवीन असं काहीच नव्हतं. लोकांना आवडेल किंवा त्यांच्या लक्षात राहिल अशी मुलाखत व्हावी अशी सर्वांची इच्छा होती. रामदास फुटाणे यांनी राज ठाकरेंचं नाव सुचवल्यानंतर सर्वांनी त्यावर एकमत दर्शवलं होतं. 
 

Web Title: Raj Thackeray to interview Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.