Raj Thackeray: मनसे पक्षाचा झेंडा हाती अन् विविध घोषणा; वसंत मोरे राज ठाकरेंच्या सभास्थळी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 10:44 AM2022-05-22T10:44:25+5:302022-05-22T10:45:30+5:30
राज ठाकरेंच्या सभेला मनसेचे नेते वसंत मोरे उपस्थिती लावणार की नाही, यावर चर्चा रंगवली होती.
पुणे- मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता मनसेप्रमुखराज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात थोड्याच वेळात सभा सुरु होणार आहे.
राज ठाकरेंच्या सभेला मनसेचे नेते वसंत मोरे उपस्थिती लावणार की नाही, यावर चर्चा रंगवली होती. मात्र ते सभास्थळी रवाना झाले आहे. मनसे पक्षाचा झेंडा हाती घेऊन आणि घोषणा देत विविध कार्यकर्त्यांसह वसंत मोरे सभेस्थळी रवाना झाले आहे.
मनसेचे नेते वसंत मोरे यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवल्यावर साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर वसंत मोरे पुण्यातील पक्षाच्या काही कार्यकर्त्यांवर नाराज असल्याचे दिसून आले होते. मला पक्षातून डावललं जातंय. अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती. तसेच मी शेवटपर्यंत राजमार्गावरच राहणार, असं स्पष्टीकरण वसंत मोरे यांनी दिलं होतं.
सभेसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी फलक लावून वातावरण निर्मिती केली आहे. या सभेला पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पोलिसांकडून रविवारी सकाळपासून स्वारगेट परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी धार्मिक भावना दुखावणारी तसेच चिथावणीखोर वक्तव्ये सभेत करू नयेत, आदी विविध १३ अटी पोलिसांनी घातल्या आहेत. राज ठाकरे यांनी धार्मिक भावना दुखावणारी तसेच चिथावणीखोर वक्तव्ये करू नयेत. घोषणाबाजी करू नये तसेच सभेला येणाऱ्यांनी सभेला येताना किंवा सभा संपल्यानंतर वाहन फेऱ्या काढू नयेत, यासह विविध १३ अटींवर सभेला परवानगी देण्यात आली, असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी सांगितले.