पुणे : पुण्यात आज राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे. राज ठाकरेनी औरंगाबाद, ठाणे ता सभांमध्ये भोंगे, हिंदुत्व अशा मुद्द्याला हात घातला. आता अयोध्या दौर्याबाबत देशभरात चर्चा सुरु झाली आहे. सध्यस्थितीत राज यांनी अयोध्या दौरा स्थगित केला आहे. मात्र तो दौरा का स्थगित केला याबद्दल तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यावरच पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे सभेला सुरुवात होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते, नागरिक सभेला आले आहेत. कार्यकर्त्यांनी सभेची जय्य्त तयारी केली आहे. सभेला काही अंध तरुण उपस्थित राहिले आहेत. त्यांच्याशी लोकमतने संवाद साधला.
उस्मानाबाद, पिंपरी, औरंगाबाद या भागातून हे तरुण खास राज ठाकरेंच्या सभेसाठी आले आहेत. राज यांच्या प्रत्येक भूमिका महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाची असून त्यांनी महागाई, गॅस दरवाढ अशा मुद्दयांना हात घातला पाहिजे असे मत या अंध तरुणांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, लहानापासूनच राज यांची भाषण ऐकत आलो आहे. राज ठाकरेंच्या सगळ्या भूमिका आक्रमक आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आक्रमक दाखवणारे दुसरे नेतृत्व नाही. बाळासाहेबानंतर राज साहेबच राज्याचा विकास करू शकतात असं ते यावेळी म्हणाले आहेत.
सामान्य माणसांच्या समस्येवरही बोलायला हवे
आम्हाला त्यांचे मराठी पाट्या, भोंगे हे मुद्दे महत्वाचे वाटतात. अयोद्धेबाबत ते आज बोलणार आहेत. त्यांनी सर्वच लाऊडस्पिकर बंद करण्याची भूमिका घेतली आहे. ती सामान्य नागरिकांसाठी योग्यच आहे. पण त्याबरोबरच राज यांनी महागाई, गॅस दरवाढ याबाबत बोलायला पाहिजे. एखाद्या वेळेस नोकरदार वर्ग गॅस घेऊ शकतो. पण गोरगरिबाने कुठं जायचं. त्यांना गॅस दरवाढ परवडत नाही. जर राज ठाकरेंनी याबाबत भूमिका घेतल्यास दरवाढ कमी होण्याची शक्यता आम्हाला वाटते. असा राज ठाकरेंवरचा विश्वास या अंध तरुणांनी यावेळी व्यक्त केला आहे.