पुणे : राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत भोंग्याबाबत पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील सभेत त्यांनी भोंगे उतरवण्याबाबत ३ तारखेचा अल्टिमेटम दिला होता. आता मात्र ईदच्या मध्ये काही अडचण येऊ नये. म्हणून ४ तारखेपर्यंत भोंगे उतरले पाहिजेत असा इशारा राज यांनी दिला आहे. भोंग्याच्या या वादामुळे मनसेचे काही पदाधिकारी नाराज असल्याचे दिसू लागले आहे. सुरुवातीला पुण्यातील मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला होता. त्यानंतर मुंबईमध्येही राजीनामा सत्र सुरु झाले. आता औरंगाबादच्या सभेनंतर दौंडमधील जमीर सय्यद यांनी मनसे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असल्याने राजीनामा देत आल्याचे त्यांनी पत्रात संगितले आहे.
''मी जमीर सिकंदर सय्यद राहणार गांधी चौक, दौंड येथील रहिवासी असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना दौंड शहर अध्यक्ष म्ह्णून गेली ३ वर्षे कार्यरत आहे. परंतु मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत केलेल्या वक्तव्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना दौंड शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. सुधीर पाटसकर यांनी माझा राजीनामा मंजूर करावा ही नम्र विनंती. असे सय्यद यांनी पत्रात नमूद केले आहे.''
भोंगे काढले नाहीत तर त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू
औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांनीच महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले. तसेच प्रबोधनकार ठाकरे, जेम्स लेन, बाबासाहेब पुरंदरे अशा विविध मुद्द्द्यांवरून त्यांनी पवारांना खडेबोल सुनावले. त्यानंतर राज ठाकरे यांनी भोंग्याच्या विषयाला हात घातला होता. रमजान ईदपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची भूमिका घेणार नाही. परंतु त्यानंतर जर मशीदवरून भोंगे काढले नाहीत. तर त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशारा राज यांनी सगळ्यांना दिला आहे.