पुणे : वाहतूककोंडीचा अनुभव पुणेकरांना नवीन नाही. पाऊस असो किंवा रणरणत ऊन असो पुण्यात वाहतूककोंडी नित्याची आहे. याच वाहतूक कोंडीचा फटका अनेक सेलिब्रेटींनाही बसला आहे. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सिनेस्टारदेखील पुण्याच्या ट्रॅफिकला घाबरतात.याच वाहतूक कोंडीचा अनुभव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही नुकताच आला.
पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतः बुधवारी हा किस्सा सांगितला. ठाकरे यांची पत्रकार परिषद मंगळवारी संध्याकाळी आयोजित केली होती. मात्र रद्द करण्यात आली याचे निमित्त ठरले पुण्याची ट्रॅफिक.याबाबत ठाकरे म्हणाले, ' खरं तर काल आपण भेटणार होतो मात्र मला नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि गाडी सोडून मला चालत घरी यावं लागलं'.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनाही असाच अनुभव आला होता.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही पिंपरीतील दुचाकीवर जातानाचा फोटो व्हायरल झाला होता. चाळीस लाख लोकसंख्या आणि त्यापेक्षा अधिक गाड्या शहरात असल्याने राज ठाकरेच नाही तर अनेकांना पुण्याच्या वाहतूक कोंडीने पायपीट करण्याची वेळ आणली आहे.