Raj Thackeray: 'वसंत, तू मिसळ महोत्सव घे', पुण्यातील भेटीत राज ठाकरेंचा असाही सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 03:40 PM2022-05-08T15:40:44+5:302022-05-08T15:42:00+5:30
वसंत मोरे मनसेच्या कार्यक्रमात सहभागी न झाल्याने पुन्हा एकदा त्यांच्या पक्ष सोडण्याबद्दलच्या चर्चा रंगल्या होत्या.
पुणे - मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाला मशिदींवरील भोंगे काढण्याचे आवाहन केले होते. ३ मे पर्यंत हे भोंगे न उतरवल्यास 4 मे पासून मनसैनिक मंदिरांवर हनुमान चालिसा लावतील, असे म्हणत राज ठाकरेंनी इशाराही दिला होता. त्यानुसार, मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलनही केले होते. त्यामध्ये मनसेचे कट्टर समर्थक असलेले वसंत मोरे दिसून आले नाहीत. तर, पुण्यात राज ठाकरेंच्या महाआरतीलाही ते गैरहजर होते. मात्र, शनिवारी त्यांनी महाआरती केली अन् राज ठाकरेंची भेटही घेतली.
वसंत मोरे मनसेच्या कार्यक्रमात सहभागी न झाल्याने पुन्हा एकदा त्यांच्या पक्ष सोडण्याबद्दलच्या चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे आंदोलनादिवशी ते तिरुपती बालाजीला देवदर्शनासाठी होते. त्यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, वसंत मोरेंनी आपला तिरुपती बालाजी दौरा पूर्वनियोजित होता, असे सांगत स्पष्टीकरण दिले. विशेष म्हणजे पुण्यातील कात्रज येथे शनिवारी त्यांनी महाआरतीचं आयोजनही केलं होतं. या महाआरती दिवशी राज ठाकरे पुण्यातच होते. मात्र, ते येथे न आल्याने पुन्हा तर्क वितर्क लावण्यात येऊ लागले. पण, या महाआरती कार्यक्रमानंतर वसंत मोरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
“राज साहेब ठाकरे काल पुण्यात येणार असल्याचं मला माहीत नव्हतं. प्रसार माध्यमांमुळेच ते पुण्यात येणार असल्याची माहिती मला मिळाली. पण त्यापूर्वीच मी महाआरतीचं आयोजन केले होतं. त्याबद्दल राज ठाकरेंना मेसेज करून कळवलं होतं. तसेच या महाआरतीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या महाआरतीनंतर आज राज ठाकरे यांची पुण्यातील राजमहल या निवासस्थानी भेट घेतल्याचं'' मोरे यांनी सांगितलं.
राज ठाकरेंसोबत आजवर झालेल्या घडामोडींबाबत चर्चा केली. तसेच, महाआरतीच्या नियोजनाचेही त्यांनी कौतुक केले. राज यांना महाआरतीला येता आलं नाही. पण, वसंत तू मिसळ महोत्सव घे, मी नक्की येईन.. असे आश्वासन राज यांनी वसंत मोरेंना दिलं. लवकरच आणखी एका कार्यक्रमाची तारीख जाहीर करणार असून राज ठाकरे या कार्यक्रमाला निश्चित उपस्थित असतील, असे मोरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पक्षातील असंतु्ष्ट आत्मे विरोधात अफवा पसरवतात
पक्षातील काही असंतुष्ट आत्मे माझ्या पक्ष सोडण्याबाबत सतत अफवा पसरवत आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, मी पक्षातच आहे, आणि अशा लोकांपासून पक्षाला धोका असल्याचे आपण राज ठाकरे यांच्या कानावर घातले असल्याचे देखील वसंत मोरे यांनी सांगितले. मी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी बालाजी दर्शनाला गेलो होतो. अक्षय्य तृतीयेनिमित्ताने हे नियोजन केले होते. त्यामुळे मला आंदोलनात सहभागी होता आले नाही. परंतु माझ्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होते. एखादा सैनिक नसेल तर लढाई हरत नाहीत. त्यामुळे जर माझ्या नसल्याने विविध चर्चा होत असतील. तरी मी अजूनही राजमार्गावरच आहे आणि राजमार्गावरच राहणार असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे.