नम्रता फडणीस-
* ऐतिहासिक वस्तुंचा संग्रह करण्याची प्रेरणा डॉ. दिनकर केळकर यांना कशी मिळाली? हे संग्रहालय कसे उभे राहिले?-डॉ. दिनकर केळकर हे पिढीजात चष्म्याचे दुकान चालवित असतं. कवी अज्ञातवासी नावाने ते कविता करतं. ऐतिहासिक विषयांवर कविता करणं ही त्यांची खासियत होती. कविता करता करता ऐतिहासिक वस्तू आपल्याकडे का असू नयेत? असे त्यांना वाटले आणि त्या वस्तुंचा संग्रह करण्याचा छंद त्यांना जडला. त्यांनी सर्वप्रथम लघुचित्र संग्रहीत केले. त्यांनाही त्यांच्या संग्रहाचे रूपातंर हे संग्रहालयामध्ये होईल असे वाटले नव्हते. 60 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्याला संग्रहालयाचे स्वरूप प्राप्त झाले. 1935 च्या सुमारास त्याचे नाव ‘राजा संग्रह’ असे होते. त्यांचा एकुलता एक मुलगा राजा याचे वयाच्या दहाव्या वर्षी निधन झाल्यानंतर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याचे नाव ‘राजा दिनकर केळकर संग्रहालय’’ असे ठेवण्यात आले. वयाच्या 75 व्या वर्षापर्यंत त्यांना ‘वेडा केळकर’ असे म्हटले जायचे. वयाच्या 75 ते 95 वर्षांमध्ये त्यांची समाजाने ख-या अर्थाने दखल घेतली.
* संग्रहालयात कोणकोणत्या वस्तुंचा संग्रह आहे?*संग्रहालयात नवव्या शतकापासूनच्या अनेक वस्तू पाहायला मिळतील. भारतीय जीवनशैली आणि परंपरांचे दर्शन घडविणारा हा संग्रह आहे. लाकडी नक्षीकामाचे छत, दरवाजे, खडक्या, गणेशपट्या, झरोके, जयविजय, मीनाक्षी, पंचमुखी मारुती यांचे पुतळे, पितळी दीपस्तंभ, पाषानच्या मूर्तींचाही समावेश आहे. या वस्तू महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, दक्षिण भारत वेगवेगळ्या राज्यातून त्यांनी संकलित करण्यात आल्या आहेत. मात्र जागेअभावी केवळ साडेअकरा टक्केच वस्तू प्रदर्शित होऊ शकल्या आहेत. केळकरांचे खरे काम त्याअर्थाने समोर आलेलेच नाहीये. संग्रहालयाकडे आंतरराष्ट्रीय दर्जाची जबरदस्त क्षमता आहे. मात्र ते जाणणारं राजकीय, प्रशसकीय आणि उद्योजकीय नेतृत्व मिळायला हवे.
* शासनाकडून ‘म्युझियम सिटी’ प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली, त्याचे पुढे काय झाले?-राज्य शासनाने बावधन बुद्रृक (ता.मुळशी) येथे सहा एकर जमिन दिली आहे. त्या जागेवर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय उभारले जाईल. त्यामध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक, संशोधनात्मक आणि मनोरंजनात्मक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा संग्रहालयाच्या व्यवस्थापन मंडळाचा मानस आहे. गेले काही वर्ष त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
* शंभरी पार केलेल्या या संग्रहालयाला शासनाकडून आर्थिक सहकार्य मिळते का? नव्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? -शासनाकडून संग्रहालयाला वार्षिक व्यवस्थापन अनुदान दिले जाते. पण त्यामध्ये अर्थसंकल्पीय कपात होते. 60 लाख रूपये मिळायला हवेत पण 20 ते 30 टक्क्क्यापर्यंत कपात केली जाते. प्रस्तावित प्रकल्पाला 100 कोटी रूपये मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारकडून निधी उपलब्ध झाला तर लवकरात लवकर नवीन संग्रहालय उभे राहू शकेल.
* संग्रहालयासमोरची आव्हाने कोणती?- नवीन पिढीची पावले संग्रहालयाकडे वळायला हवीत. मात्र सध्या नवी पिढीसमोर अनेक आकर्षण आहेत. ती पिढी एखाद्या गोष्टींसाठी एखाद्या स्थळाला भेट देते. त्या सोयीसुविधा संग्रहालयात निर्माण करणे. ज्यायोगे ती साधन तरूणपिढीला संग्रहालयापर्यंत घेऊन येतील. हेच मोठे आव्हान आहे. त्याकरिता आगामी काळात संग्रहालयात वायफाय कनेक्शन देणे, सोशल मीडियावर सक्रीय होणे यावर भर दिला जाणार आहे. यातच देशविदेशातील पर्यटक हे प्रामुख्याने संग्रहालयाला मोठ्या प्रमाणावर भेट देतात. परंतु पुणेकरांनी मोठ्या संख्येने संग्रहालयाला भेट देणे आवश्यक आहे. दुर्दैवाने तसे होत नाही.
* आगामी योजना काय?-मुला-मुलींना संस्कृतीचे महत्व पटवून देण्यासाठी इन्स्टिट्यूशन आॅफ इलेक्ट्रिकल अँंड इलेक्ट्रॉनिक पुणे शाखेच्या सहकार्याने वर्षभर शाळा- महाविद्यालयांमध्ये विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम ’पुणे स्टेÑम महोत्सव’च्या माध्यमातून करण्याचा मानस आहे. --------------------------------------------