राजर्षी शाहूमहाराज आणि प्रबोधनकार के. सी. ठाकरे हे सामाजिक दीपस्तंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:18 AM2018-12-28T00:18:31+5:302018-12-28T00:18:40+5:30
राजर्षी शाहूमहाराज आणि प्रबोधनकार के. सी. ठाकरे हे सामाजिक दीपस्तंभ होते असे मत प्रसिद्ध साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न.म. जोशी यांनी व्यक्त केले.
पुणे : राजर्षी शाहूमहाराज आणि प्रबोधनकार के. सी. ठाकरे हे सामाजिक दीपस्तंभ होते असे मत प्रसिद्ध साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न.म. जोशी यांनी व्यक्त केले. मानवी हक्क संस्थेचे प्राचार्य डॉ. राम दशरथ आबणे यांनी लिहिलेल्या राजर्षी शाहूमहाराज व प्रबोधनकार ठाकरे यांचे सामाजिक विचार, संत रविदास यांचे कार्य व विचार, आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद चरित्र या तीन पुस्तकांचे प्रकाशन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी दौंडचे विद्यमान आमदार अॅड. राहुल कुल, लक्ष्मीकृपा सह. बॅँकेचे संचालक रविंद्रनाथ आबनावे, जि.प. पुणे माजी अध्यक्ष वैशाली आबणे, माजी शिक्षणाधिकारी पंढरीनाथ अढागळे, मानवी हक्क संस्थेचे राष्टÑीय सचिव राजेश गवळी यांचे हस्ते प्रकाशन पार पडले. जोशी म्हणाले, डॉ. राम आबणे यांच्या या पी.एच.डीवर आधारित ग्रंथामुळे समाजप्रबोधनाची वाट सुकर झाली आहे. एकविसाव्या शतकाचे प्रबोधन या सर्व ग्रंथामुळे अधिक उन्नत होईल. त्यांनी डॉ. आबणे यांच्या पीएचडीच्या हॅट्रिकचेही खास कौतुक केले. आमदार कुल यांनीही छोट्या भाषणात डॉ. आबणे यांच्या लेखनकार्याला धन्यवाद देऊन हे ग्रंथ विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांना मार्गदर्शक ठरावे असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राम आबणे यांनी केले. आभार प्रदर्शन संदीप दळवी यांनी मानले.