खंडणीखोर सावकार पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:16 AM2021-08-25T04:16:37+5:302021-08-25T04:16:37+5:30
पुणे : व्याजाने दिलेल्या प्रतिमहिना १० टक्के दराने व्याज वसूल केल्यानंतर देखील खंडणी मागणारा सावकार आणि त्याच्या साथीदाराला गुन्हे ...
पुणे : व्याजाने दिलेल्या प्रतिमहिना १० टक्के दराने व्याज वसूल केल्यानंतर देखील खंडणी मागणारा सावकार आणि त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. अडीच लाखांची खंडणी स्वीकारण्यासाठी आले असता त्यांना पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड व श्रीकांत चव्हाण यांच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
ज्ञानेश्वर किसन पवार (वय ४२, रा.वैदूवाडी, हडपसर), ओंकार संदीप तिवारी (वय २३, रा. शिवनेरीनगर कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहे.
याप्रकरणी, दोघांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात खंडणी व सावकारी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार याच्याकडे सावकारीचा कोणताही परवाना नसताना तो अवैध सावकारी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वडगाव धायरी परिसरात रोजंदारीने पीओपी तयार करून देण्याचे काम करणाऱ्या एका व्यक्तीने आरोपी पवार याच्याकडून १ लाख ९५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याबदल्यात निर्धारित केलेल्या व्याजानुसार २ लाख ४५ हजार रुपये तक्रारदाराने पवार याला परत केले होते. मात्र, पवार याने तक्रारदाराला दमदाटी करून आतापर्यंत ४ लाख ४५ हजार रुपये वसूल केले. त्यानंतर देखील पवार हा तक्रारदार यांना जबरदस्तीने अडीच लाखांची मागणी करत होता. दरम्यान, सावकार व त्याच्या साथीदारांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने खंडणी विरोधी पथक दोन यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज केला होता.
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी पोलीस निरीक्षक पांढरे यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. आरोपी पवार व त्याचा साथीदार तिवारी हा कॅम्प परिसरात अडीच लाखांची खंडणी घेण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी सापळा रचून दोघांना अटक केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, विनोद साळुंके, सचिन अहिवळे, अमोल पिलाने यांच्या पथकाने केली.
.........
आरोपींनी तक्रारदाराकडून १० टक्के दराने व्याज आकारून तब्बल ४ लाख ४५ हजार रुपये वसूल केले. त्यानंतर देखील अडीच लाखांची मागणी करत होता. त्यानुसार तक्रार प्राप्त होताच सापळा रचून खंडणी घेताना सावकार व त्याच्या साथीदाराला रंगेहाथ अटक केली. जर असे कोणी सावकार नागरिकांना अवैध मार्गाने त्रास देऊन खंडणीची मागणी करत असतील तर त्यांनी खंडणी विरोधी पथकाशी संपर्क साधावा.
- बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक