कोळोलीत दुर्मिळ ‘मार्बल्ड बलुन फ्रॉग’ बेडुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 08:37 PM2018-06-25T20:37:51+5:302018-06-25T20:46:51+5:30
या बेडकाच्या पाठीवर असणारी संगमरवरी दगडा प्रमाणे नक्षी ही बेडकाचे वैशिष्ट्य आहे. या बेडकाला स्पर्श...
बारामती : कोळोली (ता. बारामती) येथे दुर्मिळ जातीचा बेडुक आढळला आहे.अत्यंत दुर्मिळ असलेला हा बेडुक तालुक्यात प्रथमच आढळला आहे. ‘मार्बल्ड बलुन फ्रॉग’ असे या दुर्मिळ बेडकाचे नाव आहे. बारामतीच्या युवकांमुळे या बेडकाचा शोध लागला .
कोळोली येथील अशोक कांबळे यांच्या शेतात हा बेडुक आढळुन आला आहे.सुरवातीला या बेडकाने केवळ तोंड बाहेर काढले होते.त्यामुळे घोणस साप असल्याचा भास कांबळे कुटुंबियांना झाला.त्यामुळे त्यांना साप पकडण्यासाठी येथील नेचर फ्रेंड्स आॅर्गनायझेशनच्या कार्यकर्त्यांना बोलविले. आॅर्गनायझेशनचे प्रमुख बबलु कांबळे त्यांच्या सहकाऱ्यांसह त्याठिकाणी पोहचले.यावेळी त्यांना हा घोणस साप नसुन दुर्मिळ बेडुक असल्याचे आढळुन आले. हा बेडुक पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
या बेडकाच्या पाठीवर असणारी संगमरवरी दगडाप्रमाणे नक्षी ही बेडकाचे वैशिष्ट्य आहे. नक्षी खुप आकर्षक असते. या बेडकाला स्पर्श केल्यास तो चेंडुप्रमाणे गोल होतो. हा खुप दुर्मिळ बेडुक आहे.दिवसा हा बेडुुक स्वताला जमीनीखाली पुरुन घेतो.केवळ रात्री भक्ष्य खाण्यासाठी तो बाहेर पडतो.वाळवी,मुंगी,मुंगळे आदी किटक या बेडक़ाचे भक्ष्य आहे,असे कांबळे यांनी सांगितले.
यापुर्वी परीसरात पांढरी घोणस,पांढरा नाग,पांढरा डुरक्या घोणस, पांढरा मणियार,पोवळा,रेती सर्प आदी दुर्मिळ सापांसह किंचाळणारे घुबड ,पांढरा कावळा हे दुर्मिळ पक्षी आढळले आहेत.
बारामती परिसरात हा बेडुक प्रथमच आढळला आहे.हा बेडुक दुर्मिळ असुन त्याचे वास्तव्य दाट झाडीत असते. त्याची काळजी घेउन त्याला लवकरच दाट झाडीच्या वनविभागात सोडण्यात येणार आहे, असे कांबळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.