पर्वतीवरील राष्ट्रकुट कालीन ‘लेणी’ लुप्त होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 05:10 PM2020-01-11T17:10:51+5:302020-01-11T17:38:07+5:30

बालगंधर्वांनी घेतला होता स्वच्छतेमध्ये सहभाग..

The Rashtrakut time 'caves' will be a destroy mode | पर्वतीवरील राष्ट्रकुट कालीन ‘लेणी’ लुप्त होण्याच्या मार्गावर

पर्वतीवरील राष्ट्रकुट कालीन ‘लेणी’ लुप्त होण्याच्या मार्गावर

googlenewsNext
ठळक मुद्देपर्वती टेकडीच्या दक्षिण बाजूस म्हणजेच टेकडीवरील पाण्याच्या टाकीच्या खालील बाजूस ही लेणी निसर्गाच्या तडाख्यातून आजवर वाचलेली ही लेणी नष्ट होण्याच्या मार्गावर

- लक्ष्मण मोरे -  
 पुणे : शहराच्या मध्यवस्तीतील पर्वती टेकडीच्या पोटामध्ये लपलेली राष्ट्रकुट कालीन  ‘कातळ लेणी’ देखभाल आणि संवर्धनाअभावी कचरा आणि घाणीच्या गर्तेत सापडली आहे. पुणेकरांना फारशी ज्ञान नसलेली ही लेणी आठव्या शतकापासून ऊन-वारा-पावसात आपले अस्तित्व टिकवून आहे. सहसा दृष्टीस न पडणाऱ्या आणि पर्यटकांपासून वंचित असलेल्या या लेणीला लुप्त होण्यापासून वाचविण्याची आवश्यकता आहे. 
पर्वती टेकडीच्या दक्षिण बाजूस म्हणजेच टेकडीवरील पाण्याच्या टाकीच्या खालील बाजूस ही लेणी आहे. ही लेणी सहसा दिसून येत नाही. त्यासाठी थोडी वाट वाकडी करुन जावे लागते. पर्वती टेकडीवर राष्ट्रकुट कालीन लेणी आहे याचीच बहुतांश जणांना माहिती नाही. इतिहास अभ्यासक, संशोधकांना या लेणीबद्दल माहिती आहे. परंतू ती सुद्धा अगदी जुजबी.


इतिहास अभ्यासकांच्या मते ही लेणी साधारणपणे आठव्या ते दहाव्या शतकादरम्यान कोरण्यात आलेली असावी. पुण्यामध्ये राष्ट्रकुट काळामध्ये कोरण्यात आलेल्या काही लेण्यापैंकी ही एक लेणी आहे. शिवाजीनगर परिसरातील पाताळेश्वर लेणी ही आठव्या शतकामध्ये कोरण्यात आल्याचे सांगण्यात येते. पर्वतीची लेणीही त्याच धाटणीची असून यासारख्या लेण्या बाणेर, येरवडा येथे पहायला मिळतात. त्यामुळे या सर्व लेण्या समकालीन असाव्यात असा अंदाज आहे. परंतू, या लेण्या उपेक्षेच्या धनी ठरत आहेत. 
पुण्याला जसा सांस्कृतिक वारसा आहे तसाच ऐतिहासिक वारसाही आहे. आजही पुण्यामध्ये सर्वत्र इतिहासाच्या पाऊलखुणा पहायला मिळतात. विकासाच्या तडाख्यात या पाऊलखुणा लुप्त पावतात की काय अशी भिती निर्माण झाली आहे. पर्वतीवर जाणाऱ्या नागरिकांना जर या लेणीबद्द्ल विचारले तर त्यांना त्याबद्दल काहीच सांगता येणार नाही. परंतू, पर्वतीच्या या टेकडीने मागील दहा-बारा शतकांपासून आपल्या पोटातील ही लेणी जतन करुन ठेवलेली आहे. 
परंतू, निसर्गाच्या तडाख्यातून आजवर वाचलेली ही लेणी मानवनिर्मित अडथळ्यांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. इतिहासाची साक्ष असलेल्या या लेणीच्या समोर गाळ, कचरा, घाण, प्लास्टिक, चप्पल-बुटांचा थर साचला आहे. यासोबतच लेणीमध्ये असलेल्या पाण्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, बियरचे कॅन, दारुच्या बाटल्या, थर्माकोलसह लाकडी ओंडके, मोठाले दगड पडलेले आहेत. झाडी आणि झुडपांनी वेढलेल्या लेणीला सौंदर्य प्राप्त करुन देण्याची आवश्यकता आहे. 
=====
... कसे जाल?
या लेणीला भेट द्यायची असल्यास शाहू महाविद्यालयाच्या मागील बाजूने जाणे अधिक सोईचे ठरते. हाऊसिंग बोर्डाच्या इमारतींमधून जाणाºया रस्त्याने पर्वतीवरील पाण्याच्या टाकीच्या रस्त्याला लागावे. पाण्याच्या टाकीकडे न जाता पर्वतीवर जाणाºया पाय वाटेने उजवीकडे चालत जावे. किंवा पर्वतीकडून पाण्याच्या टाकीकडे जाऊन तेथून पुर्वेच्या दिशेने खाली उतरावे. थोडे खाली उतरुन पाहिल्यास कातळात लपलेली ही लेणी आपले लक्ष वेधून घेते. 
====
पर्वतीच्या लेणीमध्ये कोरीव काम नसले तरी आतील बाजूस चार खांब कोरण्यात आलेले असून त्याच्या मागे कातळात खोल्या खोदण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसते. बाहेरील बाजुने पाहिल्यास तीन मोठे गाळे असल्याचे दिसते. या लेण्यांचा घेर साधारणपणे ४० ते ५० फुट आहे. लेणीमध्ये पाण्याचे जिवंत झरे असून लेणीला पाण्याच्या टाक्याचे स्वरुप आले आहे. ऐन उन्हाळ्यातही येथील पाणी काठोकाठ भरलेले असते. 
=========
या लेणीच्या स्वच्छतेचा १९३५ साली प्रयत्न करण्यात आला होता. या स्वच्छता मोहिमेमध्ये नटश्रेष्ठ बालगंधर्व सहभागी झाले होते. काही महाविद्यालयांनी सुद्धा लेणीमधील घाण व गाळ स्वच्छ करण्याचा ४०-४५ वर्षांपुर्वी प्रयत्न केला होता. परंतू आतमध्ये प्राचीन अवशेष न मिळाल्याने पुढे याठिकाणी फारसे काही होऊ शकले नाही. 
=========
पर्वतीवरील लेणीमध्ये कोरीव काम नसले तरी ती दहाव्या किंवा बाराच्या शतकामध्ये कोरलेली असावी. पर्वतीच्या लेणीमध्ये पाणी लागल्यामुळे तेथे टाके निर्माण झाले. त्यामुळे कदाचित हे काम अर्धवट सोडण्यात आले असावे. या लेण्यांबाबतचा उल्लेख पुणे नगर संशोधन वृत्त खंडामध्ये आलेला आहे.  यासोबतच पेशवे दप्तरामध्येही या लेणीचा उल्लेख आहे. पर्वतीवरील विष्णू देऊळामागेही लेणी असल्याचा उल्लेख आहे. परंतू, कालौघात ही लेणी बुजली असण्याची शक्यता आहे. 
- मंदार लवाटे, इतिहास अभ्यासक
========

Web Title: The Rashtrakut time 'caves' will be a destroy mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.