राष्ट्रवादी ‘पश्चिम महाराष्ट्रवादी’ पक्ष : गिरीश बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 09:16 PM2018-04-30T21:16:29+5:302018-04-30T21:16:29+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेले मोर्चे हे हल्लाबोल नसुन डल्लाबोल मोर्चे आहेत, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.
बारामती : बारामतीसह पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची दादागिरी मोडीत काढत भाजप ताठ मानेने उभा राहत आहे. तसेच पक्षाचे विदर्भ,मराठवाडा,कोकणात या भागात तुरळक अस्तित्व आहे. या पक्षाला राज्यस्तरीय स्वरुप नाही. त्यामुळे आगामी काळातील सर्व निवडणुका भाजप जिंकेल. इंदापुर,बारामतीमध्ये भाजपचा वेग वाढत आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ पश्चिम महाराष्ट्रवादी पक्ष राहिला आहे, अशी खरमरीत टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली.
बारामती तालुक्यातील विविध उदघाटने पालक मंत्री बापट यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी माळेगांव (ता.बारामती) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बापट बोलत होते.या कार्यक्रमाला खासदार अमर साबळे,आमदार बाळा भेगडे,बाळासाहेब गावडे,चंद्रराव तावरे, रंजन तावरे, रामचंद्र निंबाळकर,तानाजीराव थोरात आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.बापट म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेले मोर्चे हे हल्लाबोल नसुन डल्लाबोल मोर्चे आहेत.यांनीच मागच्या १५ ते २० वर्षांत मारलेल्या डल्यांमुळे कामे करता आले नाही.सिंचन,रस्ते, जलयुक्त शिवार,पाणीपुरवठा आदीबाबत निर्णय जनतेच्या विरोधात घेतले.
जुन्या काळात २००८ मध्ये केलेल्या कर्जमाफीची आकडेवारी आपल्याकडे आहे. त्या काळात मुंंबईत जेवढे कर्ज माफ झाले ते एकत्र केल्यास अकोला ,यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांपेक्षा अधिक होते.त्यामुळे बोगस खातेदार कोण होते,कोणाला कसे पैसे दिले,कोण बँकांचे धनी झाले, हा इतिहास सर्वांना ज्ञात असल्याचा टोला बापट यांनी लगावला.भाजपच्या पुुढे राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेसचे आव्हान नाही,तर विकासकामे पुढे नेण्याचे आव्हान असल्याचे बापट म्हणाले.
माळेगावमध्ये झालेले सत्तापरीवर्तन म्हणजे परीवर्तनाची नांदी आहे.जिल्ह्यात ११३ भाजपचे सरपंच आहेत.पंचायत समितीचे १६ सदस्य आहेत. चार ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष आहेत. गेल्या ३ वर्षात भाजपच्या मतांची टक्केवारी वाढत आहे.त्यामुळे कोणत्याही पक्षाचा हा बालेकिल्ला असल्याचा दावा करु नये.या बालेकिल्याला खिंडार पडले आहे.काँग्रेस नेतृत्वहीन पक्ष असल्याची टीका पालक मंत्री बापट यांनी केली. भाजप नेते उद्घाटनासाठी सरसावलेलेल नाहीत.विकास कामे कोण करत आहे,या कामांसाठी निधी कोण देत आहे, हे सर्वसामान्यांना माहीत आहे.
भाजप सरकारने जहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च केल्याच्या बातम्या ऐकीव आहेत.राज्यात भाजप सरकारने केवळ ५४ कोटी रुपये खर्च केला आहे. केलेल्या योजनांची माहिती लाभार्थ्यांना मिळावी,यासाठी सरकार हा खर्च करीत आहे.कोणतेही सरकार असले तरी हा खर्च करणारच असे बापट यांनी सांगितले.
धरणातील पाणी सोडल्यानंतर शेतीच्या शेवटच्या टोकला जाईपर्यंत या पाण्याची चोरी होते, हे पाणी पाझरुन वाया जाते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीचे पाणी बंद पाईपमधुन देण्याचे शासनाचे धोरण आहे.पाणीचोरीमुळे पाणी कमी पडते.शेवटच्या टोकाला असणाºया शेतीपर्यंत हे पाणी मिळत नाही.खडकवासला धरणातील दीड ते दोन टीएमसी पाण्याचे उन्हामुळे बाष्पीभवन होते.यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे.यंदाचे वर्ष चांगले जाईल.शेतीचे आवर्तन ठरल्याप्रमाणे होतील,असा दावा बापट यांनी केला आहे.
कालवा समितीच्या बैठकीमध्ये पाणीवाटपाचे निर्णय होतात.धरणातुन पाणी सोडताना,पाणीवाटप करताना याबाबतची क्रमवारी अगोदरच्या सरकारने ठरविली आहे.प्रथम पिण्यासाठी,त्यानंतर औद्योगिक वापरासाठी त्यानंतर शेवटी शेतीचा क्रम आहे. अगोदरच्या सरकारने ही क्रमवारी ठरविली असल्याचे बापट म्हणाले.
————————————
... मी काही ज्योतिषी नाही
लोकशाहीमध्ये दर पाच वर्षांनी नवीन सरकार येते. त्यामुळे पालकमंत्री हे पद निश्चित राहील हे सांगता येत नाही. एखादा प्रस्ताव शासनाकडे येउन त्याला निधी देण्यासाठी वर्ष दिड वर्ष शिल्लक आहेत. डाळींब उत्पादकांना जागा द्यायची आहे. आगामी वर्षभरात मागण्या मान्य करुन घ्या.पुढे काय व्हायचे ते होईल, असे वक्तव्य आपण केले होते. अधिकारी,मंत्री बदलतात, असा तो आशय होता. त्यामुळे पुढच्या वेळी आमचे सरकार येणार नाही, असे काही आपण बोललो नव्हतो, मी काही ज्योतिषी नाही, असे स्पष्टीकरण बापट यांनी दिले.
————————————————