भाग्यश्री गिलडा
पुणे : तरुणीवर काेयत्याने वार करणाऱ्या माथेफिरूचा ताे वार वरच्यावर झेलला आणि इतर मित्रही वेळीच धावून आले. त्यामुळे मी तिला वाचवू शकलो. तो काही सेकंदाचा थरार अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. तरुणीला पोलिस ठाण्यात सुखरूप पोहोचवून रूमवर गेलो आणि एक ते दीड तास खूप रडलो. डोक्यात खूप विचार सुरू होते. माझी बहीणसुद्धा शिकण्यासाठी बाहेर राहते, तिचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता. काही सेकंद उशीर झाला असता तर आज त्या तरुणीचा मृत्यू कसा झाला? हे सांगावं लागलं असतं हा विचार सतत डोक्यात भिनभिनत होता. यावरून एक शिकलाे, नंतर मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा त्याचवेळी पेटून उठले पाहिजे, हे शब्द आहेत जिगरबाज लेशपाल जवळगे याचे.
मी मागून त्याला घट्ट धरले तरी तो झटपटत होता
मी फक्त दहा मिनिटे अंतरावर उभा होतो. मला एक तरुण हातात कोयता घेऊन पळत येताना दिसला. सुरुवातीला कोयता गँग असल्याचे वाटून मीसुद्धा घाबरून मागे सरसावलो. त्यानंतर एक तरुणी ‘मला वाचवा, मला वाचवा’ असे ओरडत पळताना दिसली आणि मी कसलाच विचार न करता त्या तरुणाच्या दिशेने धावत सुटलो. लेशपाल याने त्याच्या हातातील कोयता पकडला होता. मी मागून त्याला घट्ट धरले तरी तो झटपटत होता. तो वार जर त्या तरुणीला लागला असता तर आज ती बचावली नसती. - हर्षद पाटील, प्रत्यक्षदर्शी
कोयत्याची मूठ माझ्या कपाळाला लागली आणि...
अचानक मोठमोठ्याने आवाज ऐकू येऊ लागल्याने मी घटनास्थळाच्या दिशेने धावत सुटलो. नेमके काय झाले होते ते मला समजले नाही. कोयता हातात घेऊन तरुणीच्या मागे पळणाऱ्या माथेफिरूला लेशपाल आणि हर्षद यांनी धरले होते. मीही लगेचच त्यांची मदत कारण्यासाठी गेलो, त्याने जोरात वार करण्याचा प्रयत्न केला आणि झटापटीत कोयत्याची मूठ माझ्या कपाळाला लागली आणि तरुणीवरचा वार हुकला. - दिनेश मडावी, प्रत्यक्षदर्शी
लोकमत सखी मंचच्या वतीने तीन नायकांचा सन्मान
सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला करणाऱ्या माथेफिरूला रोखणाऱ्या तीन नायकांचा लोकमत सखी मंचच्या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. यात लेशपाल जवळगे, हर्षद पाटील, दिनेश मडावी या तिघांचा 'लोकमत'चे संपादक संजय आवटे यांनी 'अभंगरंग' कार्यक्रमात प्रायोजकांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी सभागृहात उपस्थित सर्व सखींनी या नायकांच्या धाडसाचे उभे राहून टाळ्या वाजवत कौतुक केले. या तीन नायकांच्या रूपाने खऱ्या अर्थाने विठ्ठल भेटल्याची भावना प्रेक्षकांनी व्यक्त केली.
सकारात्मकतेचा सन्मान करणारी पत्रकारिता
'कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी नाही. माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी आहे', अशा पत्रकारितेने आपले फार नुकसान केले, असे 'लोकमत'चे संपादक संजय आवटे म्हणाले. 'कोयता ज्यांनी उगारला, त्यांच्या फोटोपेक्षा ज्यांनी कोयता रोखला त्यांचा फोटो महत्त्वाचा. मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा आहे. म्हणून 'लोकमत' या खऱ्या नायकांचा सन्मान करत आहे, असेही आवटे म्हणाले. या सत्कारप्रसंगी हजारो सखींनी उभे राहून या हिरोंना अभिवादन केले.
तिच्यात आम्हाला बहीण दिसली आणि आम्ही झेपावलो
एक तरुणी 'वाचवा, वाचवा' असे ओरडत पळते... हातात कोयता घेऊन एक तरुण तिच्या मागे पळत असताे... कोयत्याचा पहिला वार तरुणीला वरच्या वर शिवून जातो आणि रक्ताच्या धारा सुरू हाेतात... तरुणी पायात पाय अडकून खाली पडते... आजूबाजूची माणसं तिला वाचवण्यासाठी पुढे येतात; मात्र त्यांच्यावर सुद्धा माथेफिरू कोयता उगारत असल्याने घाबरून पळतात... तरुणी पुन्हा उठून एका बेकरीत शिरण्याचा प्रयत्न करते, मात्र बेकरीचा मालक दुकानाचे शटरच बंद करतो... तरुणी हतबल होऊन दोन्ही हात डोक्यावर ठेवून जीवाच्या आकांताने ओरडत असते... तिच्यावर दुसरा वार होणार... तितक्यात लेशपाल जवळगे हा जिगरबाज तरुण माथेफिरू तरुणाचा हात धरतो आणि हर्षद पाटील त्याला मागून घट्ट धरतो. दिनेश मडावी हादेखील मदतीला आला, तेव्हा त्याच्या कपाळावर कोयत्याचा मूठ लागतो आणि तरुणी थोडक्यात बचावते. या सगळ्यात फक्त काही सेकंद मागेपुढे झाले असते तर आज ती तरुणी बचावली नसती. यावर लेशपाल म्हणताे ‘तिच्यात आम्हाला बहीण दिसली आणि आम्ही झेपावलो!’