पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती रवींद्र सांकला यांच्याकडं मागितली ५० लाखांची खंडणी अन् फ्लॅटही बळकावला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 12:41 PM2021-09-21T12:41:41+5:302021-09-21T12:42:31+5:30
शिवाजीनगर पोलिसांनी तोतया वकिलासह दोघांवर दाखल केला गुन्हा
पुणे : व्यावसायिक प्रकल्पातील एक ऑफीस मोफत द्या किंवा ५० लाख रुपये खंडणी मागून ती न दिल्यास बदनामी करुन वाट लावून टाकीन अशी प्रसिद्ध उद्योगपतीला धमकी दिली. तसेच जबरदस्तीने फ्लॅटचा ताबा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी उद्योगपती रवींद्र नौपतलाल सांकला (वय ५९, रा. आर एन एस बंगलो, अॅलेक्झांड्रा रोड, कॅन्टोंमेंट) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन शिवाजीनगर पोलिसांनी राजेश ऊर्फ बॉबी खैरातीलाल बजाज (रा. डेक्कन जिमखाना) आणि बापू गोरख शिंदे (रा. मानाजीनगर, नर्हे रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर २०१९ ते १६ सप्टेंबर २०२१ दरम्यान घडला आहे. राजेश बजाज हा स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता, माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणवून घेतो.
याबाबत उद्योगपती रवींद्र सांकला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राजेश बजाज याने वकिलीची सनद नसताना बनावट ओळखपत्र तयार करुन सांकला यांचे वकील पत्र पी एम सी येथील दिवाणी न्यायालयात दाखल केले. त्यांच्याकडून ९ लाख ९० हजार रुपये वकिली फी म्हणून घेऊन त्यांचा विश्वासघात केला. तसेच बेकायदेशीरपणे सांकला यांच्या फ्लॅटचा जबरदस्तीने ताबा घेऊन आपले सामान फ्लॅटमध्ये ठेवले. बापू शिंदे याने ९३ एव्हेन्यू या व्यावसायिक प्रकल्पातील एक ऑफीस मोफत द्या किंवा रोख ५० लाख रुपये द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी केली.
खंडणी न दिल्यास वानवडी येथील बांधलेला प्रकल्प बेकायदेशीरपणे बांधलेला आहे. त्याबाबत पोलीस व इतर ठिकाणी तक्रार करुन तुमची बदनामी करुन वाट लावून टाकीन. तुम्हास कधी संपवून टाकेन अशी धमकी दिली.
राजेश बजाज याने अनेकांची यापूर्वी बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केली आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्याविरुद्ध माहिती अधिकार कायद्याखाली कागदपत्रे मागवून त्याद्वारे बदनामी केल्याबद्दल राजेश बजाज याच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केला आहे.
बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांनी फसवणूक केल्याचा दावा करीत राजेश बजाज यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांच्या फिर्यादीवरुन राजेश बजाज याला गुन्हे शाखेने ऑक्टोंबर २०१७ मध्ये अटक केली होती.