अशी फुटली अत्याचाराला वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:14 AM2021-09-07T04:14:38+5:302021-09-07T04:14:38+5:30
पुणे : पीडित मुलीचे आईवडील वानवडी भागात राहतात. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी आली नाही, हे पाहून तिच्या आईवडिलांनी शोधाशोध ...
पुणे : पीडित मुलीचे आईवडील वानवडी भागात राहतात. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी आली नाही, हे पाहून तिच्या आईवडिलांनी शोधाशोध सुरू केली. तरीही तिचा शोध लागला नाही. शेवटी त्यांनी १ सप्टेंबर रोजी वानवडी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मुलीचा शोध घेत असताना पोलिसांना तिच्या मोबाईलचे लोकेशन पुणे स्टेशन परिसरात आढळून आले. त्यादृष्टीने पोलिसांनी परिसरात शोध सुरू केल्यावर एका लॉजमध्ये ही मुलगी आल्याचे दिसून आले.
मुलीबरोबर दिसलेल्या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी तातडीने विविध पथकांची नेमणूक करून या गुन्ह्यातील आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. त्याच वेळी दुसरीकडे पीडित मुलीचा शोध सुरू होता. तिचा मोबाईल चालू बंद होत असल्याने तिचे लोकेशन मिळत नव्हते. तांत्रिक विश्लेषणात ती मुंबईहून चंदीगडकडे जाणाऱ्या रेल्वेत असल्याची माहिती वानवडी पोलिसांना मिळाली. त्यानंतर रेल्वे अधिकारी व पोलिसांशी संपर्क साधून मुलीला चंदीगड येथे थांबविण्यात आले. वानवडी पोलिसांच्या पथकाने विमानाने चंदीगडला जाऊन या मुलीला रविवारी (दि. ५) सुरक्षितपणे पुण्यात आणले.
त्यानंतर तिच्याकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यावर तिच्यावरील अत्याचाराची कहाणी ऐकून पोलीसही स्तब्ध झाले. या प्रकरणातील ८ आरोपींना पोलिसांनी रात्रीतून अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी न्यायालयात सांगितले की, हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असून त्यातील अटक आरोपी व ५ फरार आरोपींनी मिळून निर्जनस्थळी, जंगलात, लॉजवर व रेल्वे ऑफिसमध्ये अशा ३ ते ४ ठिकाणी या पीडितेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. यातील ५ फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे. रिक्षाचालक मशाक कान्याल व मीरा शेख यांनी रिक्षामध्येही तिच्यावर अत्याचार केला आहे. ती रिक्षा जप्त करायची आहे. तसेच या सर्व ठिकाणी जाऊन पंचनामा करायचा आहे. त्यानंतर न्यायालयाने सर्वांना १० दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.