शीतपेय पिण्याअगोदर 'हे' वाचा, पुण्यात बर्फाच्या लादीत आढळला मेलेला उंदीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 03:30 PM2024-04-10T15:30:58+5:302024-04-10T15:38:05+5:30
सध्या उष्णतेचा पारा वाढल्याने शीतपेयांच्या दुकानांमध्ये लोकांची गर्दी दिसत आहे...
पुणे : काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील एका प्रतिष्ठित कंपनीच्या कॅन्टीनमध्ये सामोसामध्ये कंडोम आणि गुटखा आढळून आला होता. त्यावेळी प्रतिस्पर्धी व्यावसायिकाने खाद्यपदार्थामध्ये आरोग्यास धोकादायक वस्तू टाकल्याचे समोर आले होते. आता अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी खाण्याच्या बर्फात मेलेला उंदीर आढळून आला आहे. ही घटना जुन्नर तालुक्यातील वेल्हे परिसरात घडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
सध्या उष्णतेचा पारा वाढल्याने शीतपेयांच्या दुकानांमध्ये लोकांची गर्दी दिसत आहे. ज्युस, उसाचा रस यासह अन्य शीतपेयांमध्ये बर्फ टाकला जातो. आता अशाच एका बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर आढळला आहे. या सर्व घटनेमुळे नागरिकांनी बाहेर खाताना तसेच शीतपेय किंवा इतर पेय पिताना काळजी घेणे गरजेचे आहे.
बर्फ बनविताना वापरलेले पाणी शुद्ध होते का? जर मेलेला उंदीर सापडा आहे तर, बर्फ साठविण्याची जागा चांगली आहे का? त्याठिकाणी मोकाट कुत्री, डुकरे यांचा वावर आहे का? लिंबू पाणी किंवा सरबत बनविणा-याच्या हाताला काही जखमा झालेल्या आहेत का? त्याचे हात स्वच्छ आहेत का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. पैसे देऊन स्वतःच्या आरोग्याला हाणी पोहचवणे किती योग्य आहे याचाही विचार नागरिकांनी केला पाहिजे.
खाद्य पदार्थात आढळले होते कंडोम-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका प्रतिष्ठित कंपनीच्या कॅन्टीनमध्ये खाद्य पदार्थ पुरविण्याचा करार देसाई यांच्या कंपनीसोबत झाला आहे. देसाई यांची कंपनी पूर्वी मोरवाडी येथील मे. एसआरएस एंटरप्रायझेस या उप कंपनीकडून सामोसा घेत असे. त्याबाबत त्यांनी करार देखील केला होता. मात्र एसआरएस एंटरप्रायझेसने पुरवलेल्या एका सामोसामध्ये प्रथमोपचार पट्टी मिळून आली. त्यामुळे देसाई यांच्या कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा. लि. कंपनीने ‘एसआरएस एंटरप्रायझेस’ सोबतचा करार रद्द केला.
देसाई यांच्या कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स या कंपनीने सामोसा पुरविण्यासाठी मे. मनोहर एंटरप्रायझेस या कंपनीसोबत करार केला. देसाई यांच्या कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा. लि. या कंपनीची प्रतिष्ठा मलीन व्हावी तसेच त्यांचा प्रतिष्ठित कंपनीतील करार रद्द व्हावा, यासाठी ‘एसआरएस एंटरप्रायझेस’चे मालक रहीम शेख, अझर शेख आणि मझर शेख यांनी त्यांचे कामगार फिरोज आणि विकी यांना मनोहर एंटरप्रायझेस येथील कारखान्यात रोजंदारीवर कामासाठी पाठवले.
‘एसआरएस एंटरप्रायझेस’च्या रहीम, अझर आणि मझर यांच्या सांगण्यावरून कामगार फिरोज आणि विकी यांनी सामोसामध्ये निरोध टाकला. तसेच काही सामोसामध्ये दगड, विमल पान मसाला तंबाखूजन्य गुटखा टाकला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा. लि. या कंपनीचे देसाई यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी फिरोज याला अटक केली.