लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोना संसर्ग वाढत असताना पोलिसांनी विनामास्कची कारवाई कडक केली असून बुधवारी एका दिवसात तब्बल १ हजार १४७ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ६ लाख ११ हजार ७०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मास्क अनिवार्य असूनही अनेकजण बेजबाबदारपणे विनामास्क फिरताना आढळतात. काहीजण मास्क हे नाकाच्या खाली लावून फिरताना दिसतात. अशा नागरिकांवर शहर पोलिसांनी कडक कारवाई सुरु केली आहे.
शहर पोलिसांनी बुधवार (दि. २४)पर्यंत एकूण २ लाख ३० हजार ५२९ जणांवर विनामास्कची कारवाई केली. त्यांच्याकडून ११ कोटी १६ लाख ८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक विभागासह सर्व पोलिस ठाण्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रात्रीच्या वेळी संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहे.