तळेगाव ढमढेरे : राज्यात महावितरण विभागाकडून शेतकऱ्यांच्या वीजबिल वसुलीचा विषय गाजत असताना अनेक ठिकाणी विद्युतपुरवठा खंडित करत ग्राहकांकडून वीजबिल वसुली केली जात आहे, त्याप्रमाणे विद्युत वितरण विभागाच्या शिक्रापूर उपविभागात २३ मार्चपर्यंत ग्राहकांकडून तब्बल ५ कोटी २२ लाख ५७ हजार रुपयांची वसुली करण्यात आली असल्याची माहिती शिक्रापूर महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी दिली आहे.
शिक्रापूर महावितरण उपविभाग अंतर्गत एकूण ४८ गावे येत असून, या गावांतील शेतकरी पंपधारक शेतकऱ्यांची संख्या १६ हजार १५९ इतकी असून, त्या शेतकऱ्यांची कृषीपंपांची तब्बल २२८ कोटी ७८ लाख ३४ हजार रुपये इतकी थकबाकी आहे, तर सध्या महावितरण विभागाने शेतकऱ्यांकडून वीजबिलांच्या वसुलीचा तगादा लावलेला आहे, तर यामध्ये महावितरण विभागाने शेतकऱ्यांसाठी एक योजना आखून सप्टेंबर २०२० च्या वीजबिलात ५० टक्के थकबाकी भरल्यास उर्वरित ५० टक्के रक्कम पूर्णपणे माफ, सप्टेंबर २०२० पर्यंतचा विलंब आकार शंभर टक्के माफ, सप्टेंबर २०२० पूर्वी पर्यंत थकबाकी वरील सर्व व्याज पूर्णपणे माफ, सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकी वरील व्याज १८ टक्के न आकारता वीज आयोगाने मान्यता दिलेल्या दराप्रमाणे आकारणी करण्यात येणार असल्याची योजना सुरु केली.
महावितरण विभागाने वीज पुरवठा खंडित तसेच वीजबिल वसुलीची मोहीम सुरु केल्यानंतर शिक्रापूर उपविभागाअंतर्गत शेतीपंप असलेल्या १६ हजार १५९ ग्राहकांकडील तब्बल २२८ कोटी ७८ लाख ३४ हजार रुपये थकबाकीपैकी ३२५० थकबाकी ग्राहकांनी तब्बल ५ कोटी २२ लाख ५७ हजार रुपये थकबाकी वीजबिल भरले आहे. तर ३२५ ग्राहकांनी थकबाकी बिल भरलेले असताना त्यांना महावितरणच्या योजनेतून तब्बल ३ कोटी २८ लाख ९८ हजार रुपये सुट मिळाली आहे. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात वीजबिल वसुली झालेली असताना देखील अद्याप ग्राहकांकडे १७७ कोटी ८३ लाख ७४ हजार रुपये थकबाकी येणे आहे.
वीजबिल थकबाकी ग्राहकांनी महावितरणला चांगले सहकार्य केले असून त्यामुळे ग्राहकांना देखील कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला आहे. त्यामुळे ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत आपले थकीत वीजबिल भरावे.
नितीन महाजन, उपकार्यकारी अभियंता, शिक्रापूर महावितरण विभाग.