PMC | पुणे महापालिकेत २०० पदांची भरती; आरोग्य, अग्निशामक दलासाठी होणार परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 01:34 PM2022-11-08T13:34:46+5:302022-11-08T13:35:01+5:30

आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती...

Recruitment of 200 posts in Pune Municipal Corporation; Exam to be held for Health, Firefighters | PMC | पुणे महापालिकेत २०० पदांची भरती; आरोग्य, अग्निशामक दलासाठी होणार परीक्षा

PMC | पुणे महापालिकेत २०० पदांची भरती; आरोग्य, अग्निशामक दलासाठी होणार परीक्षा

Next

पुणेे : महापालिकेत नुकतीच ४५० पदांची नोकरभरती झाली. आता आणखी आरोग्य, अग्निशामक दल व अन्य विभागातील विविध संवर्गातील पदांची भरती होणार आहे. येत्या आठवडाभरात खातेनिहाय पदसंख्या निश्चित करून जाहिरात काढली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

महापालिकेच्या आकृतीबंधाला मान्यतेसाठी बराच विलंब लागल्याने गेल्या अनेक वर्षांत अभियंते वगळता अन्य विभागांमध्ये भरतीच झालेली नव्हती. त्यामुळे सुमारे १८ हजार कर्मचारी असलेल्या महापालिकेमध्ये सध्या अनेक पदे रिक्त आहेत. महापालिकेत नुकतीच ४५० पदांची नोकरभरती झाली; मात्र आरोग्य व अग्निशामक दलासारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सुरू केलेल्या नोकरभरतीमुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

याबाबत विक्रम कुमार यांनी म्हणाले, “राज्यात मोठ्या कालावधीनंतर महापालिकांमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे महापालिकेने यामध्ये आघाडी घेतली असून अभियंते, अतिक्रमण निरीक्षक, विधी सहायक आणि लिपिक अशी सुमारे ४५० पदांची भरती करण्यात आली. यातील निवड झालेले उमेदवार लवकरच सेवेत रूजू होतील. पुढील टप्प्यामध्ये २०० हून अधिक पदांची भरती केली जाणार असून पुढील आठवड्यात या पदभरतीला मान्यता देण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य आणि अग्निशामक दलातील भरतीला प्राधान्य आहे. पदांची आकडेवारी आणि जाहिरात नजीकच्या काळात प्रसिद्ध करण्यात येईल. कार्यकारी अभियंत्यांची भरती केली जाणार असून यामुळे अनुभवी अभियंते मिळतील.”

अभियंत्यांची २५ टक्के पदे वाढणार

महापालिकेमध्ये ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. लोकसंख्येत वाढ झाल्याने २००७ मध्ये तयार केलेल्या आकृतीबंधातील जागांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. प्रामुख्याने अभियंत्यांच्या जागांमध्ये वाढ होईल. महापालिकेकडे सध्या ८०० हून अधिक अभियंते आहेत. त्यामध्ये साधारण २२ ते २५ टक्के पदांची वाढ होईल. यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेऊन आकृतीबंधाचा आढावा घेऊन प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल, अशी माहितीही विक्रम कुमार यांनी दिली.

Web Title: Recruitment of 200 posts in Pune Municipal Corporation; Exam to be held for Health, Firefighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.