लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात तीस-चाळीस वर्षे जुन्या असलेल्या म्हाडाच्या सुमारे चोवीसपेक्षा अधिक वसाहतींचा आता लवकरच पुनर्विकास होणार आहे. मुंबईच्या धर्तीवरच पुण्यात देखील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी सांगितले.
पुण्यातील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासंदर्भात सोमवारी (दि. २०) रोजी म्हाडा कार्यालयात माने-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीसाठी क्रेडाई, पुणे मेट्रो, मराठी बांधकाम व्यावसायिक, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी, नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पुण्यातील जुन्या म्हाडा इमारतीच्या पुनर्विकासासाठी यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित विषय मार्गी लावण्यास सांगितले होते. त्यानुसार ही बैठक झाली.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीतील सुमारे १७५ हेक्टर जमिनीवर १७००० विविध उत्पन्न गटातील घरे आहेत. ही बैठी घरे, इमारती सन १९६०-१९९५ या दरम्यान बांधण्यात आलेल्या आहेत.या वसाहतीमधील इमारती काळानुरूप जीर्ण व मोडकळीस आलेल्या आहेत. अस्तित्त्वातील कुटुंबांची वाढ झाल्यामुळे अतिरिक्त जागेची मागणी होऊ घातली आहे.
सद्य:स्थितीत युडीसीआरपी -२०२० मधील कलम ७.४ मध्ये म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाकरिता ३.०० चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय आहे; परंतु त्यास सोसायटी / विकासक यांचेमार्फत प्रतिसाद मिळत नाही. या नियमावलीतील अडचणींबाबत संदर्भीय बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत मंत्री गृहनिर्माण व उपमुख्यमंत्री यांनी पुणे मंडळास पुनर्विकासासंबंधी नियमावलीमध्ये आवश्यक बदल करणेबाबत निर्देश दिले आहेत. कोणत्या स्वरूपाचे नियम बदल करावेत, मुंबईप्रमाणे पुण्यात कशाप्रकारे जलदगतीने पुनर्विकास होईल यावर बैठकीत चर्चा झाल्याचे माने-पाटील यांनी सांगितले.