पुणे : राज्यातील पेट्रोलचे दर पाहून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी राज्य सरकारला दर कमी करण्याचा सल्ला शहरातील एका कार्यक्रमादरम्यान दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दर कमी करण्याबाबत सांगा, असे त्यांनी यावेळी उपस्थित असलेले पालकमंत्री गिरीष बापट यांना सांगितले. प्रधान यांनी अप्रत्यक्षपणे कर कमी करण्याची सुचनाच राज्य सरकारला यावेळी केली.
शहरात सीएनजीवरील दुचाकी उपक्रमाच्या उदघाटनप्रसंगी प्रधान यांनी हा सल्ला दिला. भाषणादरम्यान ते पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीचे फायदे सांगत होते. दोन्ही इंधनामधील दराचा उल्लेख करताना त्यांनी शहरातील पेट्रोलची ७६ रुपये प्रति लिटर किंमत पाहिली. त्यानंतर लगेचच त्यांनी व्यासपीठावर बसलेले बापट यांच्याकडे पाहत त्यांना पेट्रोलचे दर कमी करण्याचा सल्ला दिला. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा तेलाचे दर मोठ्या प्रमाणात उतरले आहेत. मात्र, तरीही देशातील ग्राहकांना त्याचा फायदा मिळत नाही. विविध राज्यांमध्ये पेट्रोलचे दर कमी झालेले नाहीत. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यावधी रुपये जमा झाले आहेत. काही राज्यांनी स्थानिक कर कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारनेही याबाबत आवाहन केले होते.
यापार्श्वभुमीवर बोलताना प्रधान यांनी बापट यांना उद्देशून पेट्रोल दर कमी करण्याचा सल्ला दिला. तुम्ही मंत्री आहात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दर कमी करण्याबाबत सांगा, असेही त्यांनी बापट यांना सुचविले. पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी त्यावरील कर कमी करणे आवश्यक आहे. प्रधान यांनी तसे अप्रत्यक्षपणे सुचविल्याची चर्चा कार्यक्रमानंतर सुरू होती.