विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 08:45 PM2018-07-05T20:45:19+5:302018-07-05T20:50:54+5:30
कॉलेजमध्ये राहिलेला अभ्यास घेण्याच्या बहाण्याने पीडितेला त्याच्या खोलीवर बोलविले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास अश्लिल फोटो सर्वांना पाठविण्याची धमकी दिली.
पुणे : कॉलेजमध्ये राहिलेला अभ्यास घेतो, म्हणून बारावीत शिकणा-या विद्यार्थिनीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार करणा-या वर्ग शिक्षकाचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी हा आदेश दिला आहे. सुनील आबासो जानकर (वय ३१, रा. करंजेनगर, ता. शिरूर, मूळ. मुंठाळे, ता. बारामती) असे जामीन फेटाळलेल्या शिक्षकाचे नाव आहे. पीडित साडेसोळा वर्षीय मुलीच्या आईने शिक्रापूर पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना ९ ते ११ मे २०१८दरम्यान शिरूर तालुक्यातील शिक्रापुर येथे घडली. जानकर याने कॉलेजमध्ये राहिलेला अभ्यास घेण्याच्या बहाण्याने पीडितेला त्याच्या खोलीवर बोलविले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास अश्लिल फोटो सर्वांना पाठविण्याची धमकी दिली. हा प्रकार घरी सांगितल्यानंतर फिर्यादी आणि नातेवाईक जानकर याला जाब विचारण्यास गेले. त्यावेळी त्याने सर्वांना शिवीगाळ आणि धक्काबुकी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी जानकर याला अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. ही घटना विद्यार्थी-शिक्षक नात्याला काळीमा फासणारी आहे. घटनेने त्या शाळेच्या परिसरात भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण आणि शिक्षिकेत्तर कर्मचा-यांविषयी परिसरातील नागरिकांमध्ये राग आहे. अनुचित प्रकार घडू नये, कायद्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुख्याध्यापकांनी त्या ज्युनिअर कॉलेजला बंदोबस्त मिळावी, अशी लेखी मागणी पोलिसांकडे केली आहे, असा युक्तीवाद अॅड. बोंबटकर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने जानकर याचा जामीन फेटाळला.