पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबारचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील डान्स बारबाबत महाराष्ट्र सरकारने केलेल्या कायद्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने हे सिद्ध झाले आहे. या निर्णयानुसार रात्री ११. ३० वाजेपर्यंत डान्सबार खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातदेखील डान्स बार बंदी हटवून ते परत सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाने दिला आहे.
सरकारच्या या निर्णयाबाबत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग (पश्चिम महाराष्ट्र विभाग) चे अध्यक्ष सनी मानकर म्हणाले, 'राज्यात डान्सबारवर घालण्यात आलेली अनेक बंधने सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यातले डान्सबार खुलेआम सुरू होणार आहेत. या बंदी उठवण्यामुळॆ कोणत्याही सुसंस्कृत व्यक्ती किंवा सुजाण व्यक्तीस आनंद होऊ शकणार नाही. हा निर्णय महाराष्ट्रासाठी आणि जनतेसाठी दुर्दैवी आहे. आम्ही या संदर्भात पश्चिम महाराष्ट्रात डान्सबार ची छमछम सुरु होऊ देणार नाही, यासाठी पावले उचलावी या करिता आंदोलन करणार आहोत.'