कचराप्रश्न पुन्हा पेटणार, हडपसरमधून गाड्या पाठविल्या परत, प्रशासन उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:56 AM2017-10-25T00:56:54+5:302017-10-25T00:57:04+5:30
पुणे : हडपसरच्या रामटेकडी भागात प्रस्तावित असलेल्या नवीन कचरा प्रकल्पाचे काम बंद करावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आक्रमक रूप धारण करण्यास सुरुवात झाली आहे.
पुणे : हडपसरच्या रामटेकडी भागात प्रस्तावित असलेल्या नवीन कचरा प्रकल्पाचे काम बंद करावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आक्रमक रूप धारण करण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी रोकेम कचरा प्रकल्पाकडे जाणा-या पालिकेच्या कचरागाड्या राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हडपसरमधून त्या परत पाठविण्यात आल्या. प्रशासनाकडून या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने तो चिघळू लागला आहे.
हडपसरमधील रोकेम कचरा प्रकिया प्रकल्पाकडे जाणाºया महापालिकेच्या कचरागाड्या राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी अडविल्या. रामटेकडी येथील महापालिकेच्या प्रस्तावित कचरा प्रकल्पाचे काम बंद झालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी या वेळी करण्यात आली. जनतेचा विरोध डावलून जर प्रकल्पाचे काम सुरू ठेवले, तर रोकेम प्रकल्प बंद पाडू, असा इशाराही आंदोलकांनी महापालिका प्रशासनाला दिला. या आंदोलनात विरोधी पक्षनेते चेतन तुपे, हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, नगरसेवक अशोक कांबळे, उत्तम अल्हाट, मामा अल्हाट, हेमंत ढमढेरे, जॅकी कल्याणी, नागेश काळुंखे, अप्पा गरड, अप्पा शिंदे, तुषार जाधव, युसुफ पठाण, इरफान तांबोळी, तोफिक सय्यद, चिंतामन लाकडे, नदीम पटेल शरीफ पठाण, मुस्ताक शेख आदींनी सहभाग घेतला.
राष्ट्रवादीचे हे आंदोलन पूर्व नियोजित नव्हते. अचानक कचरा गाड्या अडविण्यास सुरुवात करण्यात आल्याने रामटेकडी ते औद्योगिक वसाहत या दरम्यानच्या रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला. घटना समजताच वानवडी पोलीस तत्काळ पोहोचले. परवानगी शिवाय आंदोलन करू नका, अशी समज पोलिसांनी आंदोलकांनी दिली. त्यानंतर पोलीस निघून गेले.
रामटेकडी येथील रोकेम प्रकल्पात सध्या ३०० टन प्रतिदिन कचरा येत आहे. जर १२५० टनांचे नवीन प्रकल्प सुरू झाले, तर रामटेकडी वसाहतीतील नागरिकांना रस्त्यावर चालणे अवघड होणार आहे. तसेच, औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखाने बंद होऊन बेरोजगारीत वाढ होईल. हडपसर परिसरात दुर्गंधी व रोगराई वाढून सार्वजनिक आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या हितास बाधक असणारा नवीन कचरा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आला आहे.
>आॅडिटमधील शिफारशींचा प्रशासनाला विसर
महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागामार्फत कचरा प्रकल्पांचे आॅडिट करण्यात आले. त्यामध्ये कचरा प्रकल्पाच्या अनेक गंभीर त्रुटी उजेडात आल्या. त्याचबरोबर शहराच्या एकाच भागात कचरा प्रकल्प करण्याऐवजी चारही दिशांना कचरा प्रकल्प करणे आर्थिक व इतर दृष्टिकोनातून योग्य ठरेल, असे त्याच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले होते; मात्र शिफारशींची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे हडपसरचा पेचप्रसंग उभा राहिला आहे.
आयुक्तांना आश्वासनाचा विसर
हडपसर-रामटेकडी कचरा प्रकल्प हटाव समितीतर्फे कचरा प्रकल्पाविरोधात जनजागृती सुरू करण्यात आली आहे. अगोदरच या भागात महापालिकेचे ४ प्रकल्प आहेत. त्यामुळे पुन्हा नवीन प्रकल्पाला विरोध केला जात आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करू, असे अश्वासन दिले होते; मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही.
ग्रामस्थांचा विरोध
देवाची उरुळी व फुरसुंगी येथील कचरा डेपोला तेथील स्थानिक गावकºयांचा मोठ्याप्रमाणात विरोध झाल्याने तिथे कचरा टाकण्याचे प्रमाण प्रशासनला कमी करावे लागले आहे.
आता त्यापाठोपाठ हडपसरमध्ये कचरा प्रकल्पांना विरोध होतो आहे.