पुणे : ससून रुग्णालयात ट्राॅमा आयसीयूमध्ये रुग्णाला उंदीर चावल्याच्या प्रकरणाची दखल थेट वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतली आहे. याबाबत विभागाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय चाैकशी समितीने चाैकशी करून त्याचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर केला आहे, अशी माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. विनायक काळे यांनी दिली.
ससून रुग्णालयात ट्राॅमा आयसीयूमध्ये रुग्णाला उंदीर चावल्याचा आराेप रुग्णाच्या नातेवाईकांनी २ एप्रिलला केला हाेता. याबाबत सत्यस्थिती जाणून घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने चाैकशी समिती गठित केली हाेती. मात्र, या समितीने चाैकशी अहवालात काय निष्कर्ष दिला हे अधिष्ठाता यांना देखील माहिती नाही. पुढे काय कारवाई हाेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मार्चमध्ये दिले हाेते पेस्ट कंट्राेलचे टेंडर :
ससून रुग्णालयाने उंदीर, मच्छर, ढेकुण, झुरळ यांचा नायनाट करण्यासाठी मार्च महिन्यातच रिषभ पेस्ट कंट्राेल या ठेकेदाराला २ लाख ८२ हजार रुपयांचे काम दिले हाेते. तरीही उंदरांचा आणि ढेकणांचा नायनाट न झाल्याने या कंत्राटदारावर अधिष्ठाता काय कारवाई करणार? हे देखील लवकरच समजणार आहे.
पुणे स्टेशनकडून हाेताे उंदरांचा प्रवेश :
ससून रुग्णालयाजवळ पुणे स्टेशन आहे. तसेच काही जागा पडीक आहे. या ठिकाणावरूनच या उंदरांचा प्रवेश रुग्णालयात हाेत असल्याचा आणि पेस्ट कंट्राेलचा त्यांना रेजिस्टंस झाला असल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली. त्यामुळे या उंदरांचे करायचे तरी काय?, असा प्रश्न आता ससून समाेर उभा ठाकला आहे.
डीनसाहेब तुम्ही पण जरा राउंड घ्या!
ससून रुग्णालयातील कक्षात आणि सर्वच ठिकाणी अधिष्ठाता यांचा राउंड हाेणे गरजेचे आहे. सध्याचे अधिष्ठाता यांचे याकडे दुर्लक्ष झाले असून, त्यांनी या सारख्या समस्या येऊच नयेत यासाठी प्रत्येक ठिकाणी राउंड घ्यायला हवा, अशी मागणी हाेत आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाने उंदीर प्रकरणाची चाैकशी स्वतंत्रपणे केली आहे. यामध्ये ससूनमधील काेणतेही डाॅक्टर नव्हते. तसेच पेस्ट कंट्राेल करणाऱ्या ठेकेदाराबाबत याेग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- डाॅ. विनायक काळे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
वैद्यकीय शिक्षण विभागाला अद्याप अहवाल मिळालेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यावर सोमवारनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल.
- डॉ. दिलीप म्हैसेकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग