सरकार मायबापा, यंदा प्रातिनिधिक स्वरुपात का होईना पण पंढरीला पायी वारी जाऊ द्या! वारकरी करणार मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 05:14 PM2021-05-28T17:14:54+5:302021-05-28T17:16:43+5:30
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी एसटी बसने आषाढी यात्रेला पालखी सोहळे आणावे लागल्यानंतर यंदा मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे.
पुणे : दरवर्षी तहान भूक विसरून नामस्मरणाच्या गजरात न चुकता पंढरीची पायी वारी आणि आषाढी एकादशीला विठुमाऊलीचं डोळे भरून दर्शन ही वारकऱ्यांच्या दृष्टीने जीवनाच्या सार्थकतेची व्याख्या म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण मागच्या वर्षी कोरोना संकटामुळे विठुरायाच्या लेकराची पायी वारी चुकली. वर्षभर ही सल उराशी घेऊन काढल्यावर यंदा तरी पायी वारी घडेल अशी आशा आहे. मागच्यावर्षी राज्य शासनाने मानाच्या पालख्यांना एसटी बसने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरीला जाण्याची परवानगी दिली होती. या कठीणप्रसंगी वारकरी संप्रदायाने मोठ्या संयमाचे दर्शन घडविले. मात्र यंदाच्या वर्षी वारकऱ्यांकडून पायी वारीची मागणी जोर धरू लागली आहे. प्रातिनिधिक स्वरूपात का होईना पण पायी वारी पंढरीला जाऊ द्या अशी मागणी वारकरी राज्य शासनाकडे करणार आहे.
यंदा २० जुलै रोजी आषाढी एकादशी असून १ जुलैला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तर २ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान आहे. मात्र, अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याने मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यात सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात देखील कोरोनाची साथ असल्याने यंदा आषाढी यात्रा कशी घ्यायची हा पेच सरकारच्या पुढे आहे.
पुण्यात पुणे जिल्ह्यातील संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे नियोजन कण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी (दि.28) रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत वारकरी पायी वारीची मागणी करणार आहेत. मात्र, वारीबाबत काय निर्णय घेतात याकडे वारकरी समाजासह संपूर्ण राज्याचे डोळे लागले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी एसटी बसने आषाढी यात्रेला पालखी सोहळे आणावे लागल्यानंतर यंदा मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. कोरोनाचे निर्बंध चालतील मात्र बंदी नको, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देहू, आळंदी आणि इतर मानाच्या सात पालखी सोहळा संस्थांशी चर्चा करणार असून यातून मार्ग निघेल अशी वारकरी संप्रदायाला अपेक्षा आहे.