वाहन परवान्याच्या ऑनलाईन कामांना आधार आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:17 AM2021-02-06T04:17:44+5:302021-02-06T04:17:44+5:30
पिंपरी : वाहन परवाना, परवाना नूतनीकरण, मालकी हक्क हस्तांतर अशा सोळा प्रकारच्या सेवा ऑनलाईन देणार आहेत. त्यासाठी आधार कार्ड ...
पिंपरी : वाहन परवाना, परवाना नूतनीकरण, मालकी हक्क हस्तांतर अशा सोळा प्रकारच्या सेवा ऑनलाईन देणार आहेत. त्यासाठी आधार कार्ड या एकाच कागदपत्राची आवश्यकता असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवेमध्ये सुलभता यावी यासाठी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे नागरिकांना परिवहन विभागाशी संबंधित कामे करण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे परिवहन विभागाने वाहन परवाना, वाहन नोंदणी संदर्भातील कामे आधार कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. आधार कार्डमुळे व्यक्तीची संपूर्ण ओळख पटत असल्याने एकाच कागदपत्राच्या आधारे परिवहन विभागाच्या सेवा घेता येतील. नागरिकांना प्रत्यक्ष येण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे चेहराविरहीत सेवा (फेस लेस) अस्तित्वात येणार आहे.
शिकाऊ वाहन परवाना, वाहन परवान्याचे नूतनीकरण, वाहन परवान्याची नक्कल काढणे, वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरील रहिवासी पत्ता बदलणे, आंतरराष्ट्रीय वाहन परवाना, वाहनाच्या तात्पुरत्या नोंदणीचा अर्ज, वाहन परवाना परत करणे, नोंदणी प्रमाणपत्राची नक्कल मिळविण्याचा अर्ज, नोंदणी प्रमाणपत्रासाठीचे ना हरकरत प्रमाणपत्र, वाहन मालकी हस्तांतरण नोटीस, वाहन परवान्यातील पत्ता बदलल्याची माहिती देणारा अर्ज, वाहनचालक प्रशिक्षण केंद्र नोंदणी अर्ज, राजनैतिक अधिकाऱ्यासाठीचा वाहन नोंदणी अर्ज अशा विविध अर्जांचा समावेश आहे. या निर्णयावर नागरिकांना येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि मते नोंदविता येतील. त्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, ट्रान्स्पोर्ट भवन, संसद मार्ग नवी दिल्ली येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.