पुणे - महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गातून द्यावे अशी मागणी पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली. मराठा समाजाच्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज सरकारला सादर करण्यात आला. समाजात आरक्षणाच्या लढाईबाबत जनजागृती व्हावी यासाठी पुण्यात सासवडपासून संवाद यात्राही काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.यावेळी सांगण्यात आले की, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यास ते न्यायालयात टिकणार नाही.अशावेळी सरकारने समाजाची दिशाभूल न करता इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण द्यावे. मराठा आणि कुणबी समाज एकच असून या मार्गाने मिळलेले आरक्षणच टिकू शकते असेही यावेळी सांगण्यात आले.यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर म्हणाले की, मराठा समाजाने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी 58 मोर्चे काढले.मात्र अजूनही सरकार दिरंगाई करत आहे. आताही हिवाळी अधिवेशन 19 तारखेला सुरू होत असताना आरक्षणाचा प्रश्न पुढे टाकला जात आहे.या संदर्भांत 26 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्यात यावा.तसेच समाजाला कुठल्याही न्यायलयात वैध ठरणाऱ्या पद्धतीप्रमाणे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे.
एकच आहेत कुणबी-मराठा; ओबीसी प्रवर्गातून देऊन टाका आमचा वाटा, मराठा समाजाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 5:02 PM