दापोडी परिसरात आरक्षणांचा बोजवारा
By Admin | Published: December 26, 2016 03:06 AM2016-12-26T03:06:26+5:302016-12-26T03:06:26+5:30
दापोडी येथे महापालिकेने विविध विकासकामासाठी तब्बल ३८ हेक्टर जागेवर ४० आरक्षणे टाकली आहेत.
पिंपरी : दापोडी येथे महापालिकेने विविध विकासकामासाठी तब्बल ३८ हेक्टर जागेवर ४० आरक्षणे टाकली आहेत. मात्र, अग्निशामक केंद्र, क्रीडांगण, उद्यान, जलतरण तलाव, बसस्थानक, किरकोळ बाजार, सांस्कृतिक केंद्र, महिलांसाठी प्रसूतिगृह अशी महत्त्वाची आरक्षणेही गेल्या ४० वर्षांत विकसित करण्यात आलेली नाहीत. या आरक्षित जागेपकी केवळ साडेचार हेक्टर जागा महापालिकेच्या ताब्यात असून, ३४ हेक्टर जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही.
पिंपरी -चिंचवड महापालिका अस्तित्वात आल्यानंतर दापोडी परिसर पिंपरी महापालिकेत समाविष्ट केला. पुण्यातून उद्योगनगरीत प्रवेश करतानाच दापोडी हे पहिले गाव. मात्र, मूलभूत सोयी-सुविधांपासून दापोडी अद्यापही वंचित आहे. ३५ ते ४० वर्षांपूर्वी दापोडी परिसरात विविध विकासकामांसाठी आरक्षणे टाकली आहेत. मात्र, ही आरक्षणे विकसित झालेली नाहीत. महापालिकेच्या विभागीय कार्यालयासाठी २३ गुंठे जागेसह खेळाच्या मैदानासाठी दोन हेक्टर जागा, अग्निशामक केंद्र्रासाठी एक एकर जागा, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी ११ हेक्टर ७१ गुंठे, बेघरांसाठी घरे बांधण्यासाठी १ हेक्टर २८ गुंठे, माध्यमिक शाळांसाठी ३ हेक्टर ५४ गुंठे, प्राथमिक शाळांसाठी एक हेक्टर, पोहण्याच्या तलावासाठी ९० गुंठे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याकरिता १ हेक्टर ७८ गुंठे, उद्यानांसाठी पाच हेक्टर, स्मशानभूमीसाठी २ हेक्टर ८१ गुंठे, बसस्थानकासाठी तीन हेक्टर अशा विविध प्रकारच्या विकासकामांसाठी ३८ हेक्टर ६४० गुंठे जागेवर ही आरक्षणे टाकली आहे. (प्रतिनिधी)