पुणे : मनुष्यबळ न वाढविताच ससून रुग्णालयात अचानक कोरोनाचे ३०० बेड वाढविण्यचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ससूनमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने शुक्रवारपासून तातडीच्या नसलेल्या वैद्यकीय सेवांचे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, कोरोना वॉर्डसह तातडीच्या कोणत्याही सेवेवर परिणाम होऊ दिला जाणार नाही, असे मार्डतर्फे सांगण्यात आले आहे. मार्डचे सचिव ज्ञानेश्वर जामकर म्हणाले, गेल्या वर्षभरापासून आम्ही रुग्णसेवेचे काम करीत आहोत. सध्या ससूनमध्ये ५५० कोरोनाचे आणि ४५० इतर रुग्ण आहेत. मात्र, निवासी डॉक्टरांची संख्या केवळ ४५० आहे. आणखी ३०० बेड वाढविले तर किमान १०० डॉक्टरांची गरज लागणार आहे. तरच रुग्णांना चांगली सेवा देणे शक्य होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत कालच बैठक झाली. त्यांच्यापुढेही आम्ही आमची मागणी मांडली आहे. आमची मनुष्यबळ वाढविण्याची मागणी आहे. त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर उद्यापासून तातडीच्या नसलेल्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून कोरोना वॉॅर्ड, कॅॅज्युलिटी, आयसीयू, लेबर रूम, सर्व प्रकारच्या तातडीच्या शस्त्रक्रिया वगळता इतर सेवा देणे बंद केले जाणार आहे.
ससूनमधील निवासी डॉक्टरांचा काम बंदचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:11 AM