पिंपरी : दापोडीतील लिंबोरे चाळीत पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांनी रात्र जागून काढली. महापालिका प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्याने संतप्त नागरिकांनी पुणे- मुंबई महामार्ग पहाटे चारला रोखून धरला. रास्ता रोको केला. मंगळवारी दिवसभर झालेल्या संततधारेमुळे लिंबोरे चाळीतील सुमारे ३० ते ४० घरांत गुडघाभर पाणी शिरले. हा प्रकार रात्री दहाच्या सुमारास घडला. रात्री हे पाणी वाढतच गेले. खाट, फ्रीज, टेबल व खुर्च्यांवर बसून नागरिकांनी आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यात महिला, लहान मुले आणि वृद्धांची मोठी गैरसोय झाली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले आले. त्यांनी नागरिकांची समजूत काढून महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. ‘क’ प्रभाग कार्यालयाचे शहर अभियंता बोत्रे आणि पथक घटनास्थळी सकाळी सहाला दाखल झाले. त्यांनी मशीन लावून घरातील पाणी बाहेर काढले. भूमिगत वाहिनी पावसाच्या पाण्यात तुंबते. त्यामुळे पाणी चाळीत शिरते. वारंवार तक्रारी करूनही महापालिका दखल घेत नसल्याचे शिवसेनेचे विभागप्रमुख तुषार नवले व सामाजिक कार्यकर्ते मेहबूब शेख यांनी सांगितले. (वार्ताहर)
रहिवाशांनी रात्र काढली जागून
By admin | Published: July 31, 2014 3:09 AM