पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे नोव्हेंबर 2016 मध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षाच्या मॅकॅनिकल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली. मात्र,अद्याप परीक्षा विभागाकडून निकाल जाहीर करण्यात आला नाही.लवकर निकाल लागला नाही तर विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकणार नाहीत.त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा परीक्षा विभागाकडून घेतली. अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा नोव्हेंबर मध्ये घेतली गेली असली तरी त्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. परीक्षा संपून ६० दिवस झाले नाहीत. यामुळे अद्याप निकाल जाहीर करण्यात आला नाही, असे परीक्षा विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांना १ मार्च पूर्वी परदेशात शिक्षण घेण्यासाठी जायचे आहे. त्यापूर्वी निकाल जाहीर झाला नाही आणि त्यांना ट्रान्सक्रिप्ट प्रमाणपत्र मिळणार नाही.परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते. त्यामुळे विद्यापीठाने लवकर निकाल जाहीर करावा, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)
अभियांत्रिकीचा निकाल सोमवारपर्यंत
By admin | Published: January 25, 2017 2:28 AM