पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर केला आहे. १६ हजार ५९२ उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले आहेत. यंदा परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदाचा निकाल कमी असला तरी गेल्या पाच वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी २०१९ परीक्षेचे आयोजन १९ जानेवारी २०२० रोजी केले. परिषदेतर्फे इयत्ता पहिली ते पाचवी गटासाठी पेपर १ तर सहावी ते आठवी गटासाठी पेपर २ या पद्धतीने टीईटी परीक्षा घेतली. राज्यातील १,८८,६८८ उमेदवारांनी पेपर १ दिला. त्यातील १०,४८७ उमेदवार पात्र ठरले. तसेच पेपर २ देणाऱ्या १,५४,५९६ उमेदवारांपैकी ६,१०५ उमेदवार पात्र ठरले आहेत. टीईटी निकालात आरक्षण, प्रवर्ग, वैकल्पिक विषय अपंगत्व आदींचा लाभ मिळाले नसल्यास येत्या १५ आॅगस्ट पर्यंत लॉगइन आयडीचा वापर करून तक्रार नोंदवावी, असे परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी कळवले.