पिंपरी : स्वस्त धान्य दुकानातील माल काळ्या बाजाराने विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर जिल्हा पुरवठा प्रशासन खडबडून जागे झाले आहे़ शहारातील नेहरुनगर, लालटोपीनगर, आनंदनगर, चिंचवड या परिसरातील रेशन दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांना मिळणारा माल आधार कार्ड लिंक नसल्यामुळे धान्य नाकारले जात होते़ परंतु, ‘लोकमत’च्या स्टींग आॅपरेशनमुळे शहरातील काळ्या बाजाराने धान्य विकणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करून नागरिकांना सणासुदीला स्वस्त धान्य मालाची कमतरता पडू देणार नसल्याचा निर्वाळा जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी दिला आहे़गेल्या काही दिवसांपासून शहरातील काही स्वस्त धान्य दुकानदार काळ्या बाजाराने मालाची विक्री करीत होते़ शासनाकडून गरिबांना रेशन धान्य माल कमी किमतीत मिळावा, यासाठी विविध योजना राबवून त्यांना धान्य मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात़ मात्र, रेशन धान्य दुकानदार आधार कार्डच्या नावाखाली गरिबांचा घास हिरावून घेत तो चढ्या बाजारभावाने विक्री करीत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने पर्दापाश केला़ अन्न सुरक्षा कायद्यांर्तगत दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना प्रतिकिलो गहू २ रुपये, तांदूळ ३ रुपये, साखर १३ रुपये ५० पैसे, तर तूरदाळ दर १०३ रुपये किलो असे दर ठरवून दिले आहेत़ तरीही शहरातील दुकानदार सर्रासपणे आधारकार्ड नाही, तर माल नाही ही भूमिका घेऊन गरिबांना माल देण्यास टाळाटाळ करीत होते़ काळ्या बाजाराने विक्री होणाऱ्या मालाची कशी विक्री होते, याचा अनुभव घेत लोकमतच्या प्रतिनिधींनी रेशन दुकानदारांचा पोलखोल केला़ आधारकार्डची सक्ती जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात आली होती़ मात्र, शहरात अनेक नागरिकांंकडे अजूनही आधारकार्ड नसल्यामुळे रेशन धान्य मिळविताना ही अट शिथिल करण्यात आली होती़ जिल्हा पुरवठा विभागाकडून दरमहिन्याला दुकानदारांचा फ क्त २० टक्के माल कपात केला जातो़ तरीही गेल्या काही महिन्यांपासून अनेक रेशन धान्य दुकानदारांकडून आधारकार्डच्या नावाखाली गरिबांचे धान्य काळ्या बाजाराने विक त होते़ (प्रतिनिधी)
स्वस्त धान्य दुकानदारांना काळा बाजार पडणार ‘महाग’
By admin | Published: September 13, 2016 12:59 AM