एसटीतील सेवानिवृत्त चालकाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:14 AM2021-09-07T04:14:58+5:302021-09-07T04:14:58+5:30
बारामती : एसटीच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या चालकाची साखर विकून पैसे देतो, अशी बतावणी करून २ लाख ५० हजार ...
बारामती : एसटीच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या चालकाची साखर विकून पैसे देतो, अशी बतावणी करून २ लाख ५० हजार रुपये घेत फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. विनयकुमार विनायक कुलकर्णी (रा. सणसर, ता. इंदापूर) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी अंबादास विठ्ठलराव नरवाडे (रा. पार्डी खुर्द, बसमती, जि. हिंगोली) याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कुलकर्णी हे एसटी महामंडळातून चालक म्हणून निवृत्त झाले आहेत. २ जून रोजी ते सणसर (ता. इंदापूर) बसस्थानकावर समवयस्क लोकांशी गप्पा मारत बसले होते. यावेळी शेजारी नरवाडे हा फोनवरून साखरेसंबंधी कोणाशी तरी बोलत होता. त्याने फिर्यादीशी बोलणे वाढवले. सेवानिवृत्तीनंतर आता पेन्शन वेळेवर मिळत नाही, असे फिर्यादीने सांगितल्यावर तुम्ही साखरेचा व्यवसाय करता, मी तुम्हाला मदत करतो, अशी खात्री त्याने दिली. सुरुवातीला फिर्यादीने २५ क्विंटल साखरेचे गिऱ्हाईक शोधले. १२ जून रोजी फिर्यादीकडून त्याने ६० हजार रुपये घेतले. त्यापोटी साखर दिली. त्यानंतर वारंवार तो साखरेसाठी गिऱ्हाईक बघा म्हणून फोन करत होता. फिर्यादीला २०० कट्टा साखरेचे गिऱ्हाईक मिळाले. त्यांनी नरवाडे याच्याशी संपर्क साधला. परंतु पैसे थोडे कमी असल्याचे सांगितले. बारामतीत या, तिथे आपण मार्ग काढू असे तो म्हणाला. त्यानुसार बारामतीतील एका ट्रेडिंग कंपनीच्या दुकानात त्यांची भेट झाली. फिर्यादीकडून २ लाख ५० हजार रुपये दुकानदारासमक्ष घेतले. दुकानदाराला यांना साखर भरून द्या, असे सांगितले. पैसे दिल्यावर फिर्यादी मार्केट यार्डातील दुकानदाराच्या गोडावूनला गाडी भरण्यासाठी गेले. परंतु गाडी भरत आली असतानाच दुकानदाराने त्यांना फोन करून नरवाडे यांनी मला पैसे दिलेले नाहीत. मी तुम्हाला साखर देत नसल्याचे सांगितले. फिर्यादीने लगेच नरवाडे याला फोन केला. परंतु त्याचा फोन बंद लागत होता. त्यानंतर त्याचा संपर्कच झाला नाही. त्याने २ लाख ५० हजार रुपये घेत १० टन साखर न देता फसवणूक केल्याचे कुलकर्णी यांच्या लक्षात आल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.