स्वातंत्र्यदिनी नौदलाचे निवृत्त मरीन कमांडोज् पाण्याखाली करणार ध्वजवंदन अन् ध्वजसंचलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 03:32 PM2022-08-14T15:32:06+5:302022-08-14T15:33:17+5:30
नवी मुंबईतील उरण येथे हा सोहळा पार पडणार असून, १० कमांडो यात सहभागी होणार
दुर्गेश मोरे
पुणे : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे नौदलाचे निवृत्ती मरीन कमांडोज पाण्याखाली ध्वजसंचलन आणि ध्वजवंदन करणार आहेत. नवी मुंबईतील उरण येथे हा सोहळा पार पडणार असून, १० कमांडो यात सहभागी होणार आहेत.
माजी मरीन कमांडो रवी कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पाण्याखाली ध्वजवंदन हा सोहळा साकारण्यात येत आहे. नवी मुंबईतील उरण येथील श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातील स्वीमिंग पूलमध्ये १५ ऑगस्टला पहाटे १२ वाजून १ मिनिटांनी हा सोहळा होणार आहे. यामध्ये पाण्याखाली ध्वजवंदन, ध्वजसंचलन आणि राष्ट्रगीत होणार आहे. या स्वीमिंग पूलची खोली १३ फूट खोल आहे.
यासंदर्भात बोलताना रवी कुलकर्णी म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत आहे. त्यामुळे हा सोहळा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. पाण्याखाली ध्वजवंदन करण्यासाठी माझ्यासह १० माजी कमांडो अर्धा तास पाण्याखाली सराव करीत आहेत. १३ फूट खोली असलेल्या स्वीमिंग पूलमध्ये तिरंगा फडकत राहावा, यासाठी ही विशिष्ट योजना व विशिष्ट तयारी करण्यात आली आहे. पाण्याखाली अर्धा तास राहणाऱ्या माजी कमांडोंसाठी खास हेल्मेट बनवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे स्कुबा डायव्हिंग सेटस्चाही यावेळी वापर करण्यात येणार आहे. या संकल्पनेत उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. हा सोहळा पाण्यावरील आणि जगातील प्रेक्षकांना व्यवस्थित पाहता यावा यासाठी पाण्याखाली खास यंत्रणा राबविण्यात आली आहे, तसेच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रात्री साडेदहा ते पावणेबारा यादरम्यान विमला तलावामध्ये तरंगत्या प्लॅटफॉर्मवर विविध कार्यक्रम आयोजिले असल्याचेही सांगितले.
सोहळ्यामध्ये हे होणार सहभागी
रवी कुलकर्णी यांच्याबरोबरच या सोहळ्यात कमांडर प्रवीण तुळपुळे, निवृत्त कमांडो एन. सी. जगजीवन, रामदास कळसे, विनोद कुमार, विलास भगत, रामेश्वर यादव, सज्जन सिंग, एन.एल. यादव, अनिल घाडगे, भूपेंद्र सिंग हे सहभागी होणार आहेत.
कोण आहेत रवी कुलकर्णी?
रवी कुलकर्णी हे सेवानिवृत्त मरीन कमांडो आहेत. त्यांच्या कल्पनेतून २००३ मध्ये जगातील पहिला पारंपरिक पाण्याखालील विवाह सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी १० जण लग्न सोहळ्यासाठी ३२ मिनिटे पाण्याखाली होते. काही महिन्यांपूर्वी कुलकर्णी यांनी पाण्याखाली मेडिटेशनही केले होते. २०२१ मध्ये त्यांनी एका वर्षामध्ये गिर्यारोहणाच्या १२५ मोहिमा पार पाडल्या. हिमालयापासून ते निलगिरीपर्यंत त्यांनी गिर्यारोहण केले. रवी कुलकर्णी यांनी गोएअर आणि ॲडलॅब इमॅजिकामध्ये पदाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.
नौदलाचे निवृत्त कमांडो १५ ऑगस्टला पाण्याखाली ध्वजसंचलन करणार; सरावाचा व्हिडिओ #Pune#IndependenceDay2022pic.twitter.com/OzahFGWH1M
— Lokmat (@lokmat) August 14, 2022