लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्र शासनाच्या नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या एक महिन्यांपासून पंजाब हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या किसान आंदोलनाचा फटका बासमती तांदळाला बसला आहे. सीमा बंद असल्याने या तांदळाच्या वाहतूकीला अडथळे निर्माण झाले आहेत. मागणी इतका तांदूळ उपलब्ध होत नसल्याने बासमती तांदळाच्या दरात क्विंटला सरासरी हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा बासमती तांदळाचे उत्पादन चांगले आहे. उत्पादन चांगले असले तरी शेतकरी आंदोलनाचा फटका या तांदळाला बसला आहे. आंदोलन संपल्यानंतरच बासमती तांदूळ देशातील विविध बाजारपेठांत आवश्यक त्या प्रमाणात पोचू शकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यंदाचा हंगाम १५ नोव्हेंबरला सुरु झाला. हंगाम सुरु झाल्यानंतर काहीच दिवसांनी सदर आंदोलन सुरु झाले. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमधून होणारी तांदळाची वाहतूक विस्कळीत झाली. ‘राइस मिल’ धारकांनीही धोका पत्कारून तांदळाची वाहतूक करण्यास नकारघंटा दिल्याने पुरेशा प्रमाणात बासमती व त्याचे सर्व उपप्रकार मिळणे अशक्य बनले आहे.
यंदाचा हंगाम गेल्या वर्षीपेक्षा कमी दराने सुरु झाला. १५ नोव्हेंबरला हंगामाच्या सुरुवातीला ११२१ बासमती तांदळाचे दर जागेवर सहा हजार ते साडेसहा हजार रुपयांपर्यंत होता. आता त्यात हजार रुपये प्रति क्विंटल वाढ होऊन सध्या ते सात-साडेसात हजार प्रति क्विंटल झाले आहेत, अशी माहिती तांदुळ व्यापारी राजेश शहा यांनी दिली. त्यांनी सांगितले की, पारंपरिक बासमती तांदळाचे दर सुरुवातीला ९ हजार रुपये प्रति क्विंटल होते आता त्यात प्रति क्विंटलला हजार रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे स्थानिक बाजारातही पारंपरिक बासमती, बासमती व इतर बासमतीचे दर वाढले आहेत.