पुणे : साडेपाच वर्षांपासून सुरू असलेल्या शिवाजी सावंत लिखित ‘मृत्यूंजय’, ‘छावा’ आणि ‘युगंधर’ या साहित्यकृतींच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या लवाद मंडळाने काँन्टिनेंटलच्या बाजूने गुरुवारी अंतिम निर्णय दिला. त्यामुळे प्रकाशनाचे हक्क पुन्हा एकदा कॉन्टिनेंटल प्रकाशनाकडे आले आहेत. स्वामित्वअधिकार समाप्तीपर्यंत हे अधिकार प्रकाशनाकडे कायम राहणार आहेत.कॉन्टिनेंटल प्रकाशनाने शिवाजी सावंत यांच्या मृत्यूंजय, छावा आणि युगंधर या साहित्यकृती प्रकाशित केल्या होत्या. मात्र, सावंत कुटुंबियांनी या तिन्ही साहित्यकृतींचे हक्क मेहता प्रकाशनाला दिले होते. यावर कॉन्टिनेंटल प्रकाशनाने जिल्हा सत्र न्यायालयाकडे दाद मागितली. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवाद मंडळाची नियुक्ती केली होती. लवाद मंडळाने पावणेचार वर्षांनंतर निकाल दिला. निर्णयानुसार, कॉन्टिनेंटल प्रकाशनाखेरीज अन्य लेखक अथवा प्रकाशकास हे साहित्य प्रकाशित किंवा वितरीत करता येणार नाही. कॉन्टिनेंटलने प्रकाशित केलेले शिवाजी सावंत यांचे साहित्य सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार तसे केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असे कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर आणि ॠतुपर्ण कुलकर्णी यांनी सांगितले.
‘मृत्युंजय’कारांच्या साहित्याचे हक्क पुन्हा कॉन्टिनेंटलकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 4:24 AM