धायरी: पंतप्रधान मोदींनी सत्तेत येताना जनतेला महागाईपासून मुक्तीचं ,अच्छे दिनचं स्वप्न दाखवलं. देशातल्या जनतेने त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातात देश सोपवला. मात्र पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल अशा सगळ्याच वस्तूंचे दर वाढवून केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे दर इतके वाढले आहेत की जनतेला जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागलं आहे. असा निशाणा साधत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले.
देशभरात कोरोनाचे आस्मानी संकट असतानाच केंद्र सरकारच्या वतीने महागाईचे सुल्तानी संकट जनतेवर लादण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
गॅस सिलिंडरचे व दुचाकी वाहनाचे श्राद्ध घालत केंद्र सरकारच्या व महागाईच्या विरोधात निषेध नोंदविण्यात आला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने हे राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ, माजी उपमहापौर दिलीप बराटे, महिला शहराध्यक्ष मृणालिणी वाणी, नगरसेवक सचिन दोडके, युवक अध्यक्ष महेश हांडे,श्वेता होनराव आदी उपस्थित होते.