रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी आरएएसएसआय (रासी) काम करते. जेपी रिसर्च इंडियाच्या या उपक्रमाला सरकार, वाहन उद्योग आणि पूरक वाहन उत्पादने तयार करणाऱ्या उत्पादकांचे सहकार्य लाभले आहे. 'रासी'चे प्रमुख काम हे संपूर्ण भारतातील रस्ते अपघाताचा अभ्यास आणि विश्लेषण करून सरकार आणि उद्योगांना सुधारणात्मक शिफारशी करण्याचे आहे.
यावेळी महात्मे यांनी वैज्ञानिक पद्धतीने माहितीचे विश्लेषण करत असल्याबद्दल 'रासी'च्या कामाचे कौतुक केले. रस्त्यावरील अपघात आणि मृत्युंचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार स्तरावर प्रयत्न सुरु असून जिल्हा स्तरावर रस्ते सुरक्षा समिती स्थापन करण्यासाठी प्रक्रिया सुरु असल्याचे ते म्हणाले.
यावेळी टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, होंडा, ह्युंदाई, बॉश, ॲटोलिव्ह, कॉण्टिनेंटल, मर्सिडिझ बेंझ आणि जेपी रिसर्च यांचे सदस्य आणि रस्ते सुरक्षा संदर्भातील विविध शासकीय संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.
---------------
'रासी'बद्दल…
रोड ॲक्सिडेंट सँपलिंग सिस्टीम हा जेपी रिसर्च इंडियाचा उपक्रम आहे. देशभर होणाऱ्या विविध प्रकारच्या रस्ते अपघातांची माहिती संकलित करून त्यांचे विश्लेषण करण्याचे काम आरएएएसएसआय करते. शासकीय धोरणे ठरविण्यासाठी ही माहिती सरकारला पुरविली जाते. तर वाहन उद्योगाला 'रासी'कडून सुरक्षित वाहन निर्मितीसाठी अभियांत्रिकीसंदर्भातील माहिती पुरविली जाते. याशिवाय उद्योगांना आर्थिक आणि तांत्रिक सहकार्यही केले जाते. सध्या ही संस्था महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये काम करते.
-------------------
पुण्यातील अपघातांचे विश्लेषण
पुण्यात नवले ब्रीजचा रस्ता अपघातस्थळ असल्याने तीन वर्षांचा डेटा घेऊन संस्थेने ३६ मोठ्या अपघातांचे विश्लेषण केले असता नवा कात्रज बोगदा उतार, सेल्फी पॉईंट आणि नवले ब्रीज हे तिन्ही हॉटस्पॉट आढळून आले. अपघाताच्या कारणाचे विश्लेषण करून स्थानिक प्रशासनाला शिफारशी केल्या आहेत , अशी माहिती संस्थेचे प्रमुख निवृत्त कमांडर प्रदीप जसवानी यांनी दिली.